IPL DC vs LSG IPL 2025 Ashutosh Sharma : अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात पंतच्या लखनौ सुपर जाएंट्सला पराभूत करत अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघानं यंदाच्या हंगामात विजयी सलामी दिली आहे. ६५ धावांवर अर्धा संघ तंबूत परतल्यावर इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात मैदानात उतरलेल्या आशुतोष शर्मानं अशक्य वाटणारा सामना दिल्ली कॅपिटल्सला जिंकून दिला. पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनौच्या संघानं २०९ धावा करत दिल्ली कॅपिटल्ससमोर २१० धावांचे लक्ष्य ठेवले होते. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच दिल्ली कॅपिटल्स संघाने एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. अखेरच्या षटकात ६ चेंडूत ६ धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर एक स्टंपिंगची संधी निर्माण झाली होती. यावेळी पंत चुकला अन् मोहित शर्मानं पुढच्या चेंडूवर एकेरी धाव घेत आशुतोष शर्माला स्ट्राइक दिले. त्याने सिक्सर मारत संघाला एक विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात आलेल्या आशुतोष शर्मानं सोडली छाप
अक्षर पटेलनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. लखनौच्या ताफ्यातील सलामीवीर मिचेल मार्शनं ३६ चेंडूत केलेल्या ७२ धावा आणि निकोलस पूरनच्या ३० चेंडूतील ७५ धावांच्या खेळीच्या जोरावर लखनौच्या नवाबांनी निर्धारित २० षटकात ८ बाद २०९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. पॉवर प्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं ४ विकेट्स गमावल्या होत्या. हा सामना जिंकणं दिल्ली कॅपिटल्ससाठी मुश्किलच वाटत होता. पण इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात आलेल्या आशुतोष शर्मानं शेवटपर्यंत मैदानात थांबून अशक्यप्राय वाटणारी मॅच फिरवली.
नव्या संघाकडून Mitchell Marsh नं जुन्या फ्रँचायझी संघाला धुतलं; IPL मध्ये जलद अर्धशतकही ठोकलं
धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची अडखळत सुरुवात
लखनौच्या संघानं ठेवलेल्या धावांचा पाठलाग करताना जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि फाफ ड्युप्लेसिस या जोडीनं दिल्ली कॅपिटल्सच्या डावाला सुरुवात केली. जेक फ्रेझर-मॅकगर्क एक धाव करून माघारी फिरला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या अभिषेक पोरेल याला खातेही उघडता आले नाही. समीर रिझवी ४ (४) आणि अक्षर पटेल २२(११) ही स्वस्तात माघारी फिरल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी वाढल्या. फाफ ड्युप्लेसी २९( १८) आणि ट्रिस्टन स्टब्स ३४(२२) हे माघारी फिरल्यावर सामना दिल्लीच्या हातून निसटलाय असेच वाटत होते.
आशुतोष-विपराज निगमनं दिल्लीच्या बाजूनं फिरवला सामना
संघ संकटात सापडला असताना विपराज निगम याने १५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने २६० च्या स्ट्राइक रेटनं ३९ धावा कुटत सामन्यात ट्विस्ट आणला. त्याची विकेट पडल्यावर आशुतोष शर्मानं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने ३१ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारासह नाबाद ६६ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने लखनौच्या तोंडचा घासच हिरावून घेतला.
Web Title: IPL DC vs LSG IPL 2025 Ashutosh Sharma Hits 66 As Delhi Capitals Beats Lucknow Super Giants By 1 Wicket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.