नवी दिल्ली : यंदा इंडियन प्रीमियर लीगचे आयोजन रिकाम्या स्टेडियममध्ये होऊ शकते, असे संकेत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सर्व राज्य संघटनांना दिले. कोरोनाच्या सावटातही आयोजनाच्या सर्वच पर्यायांचा विचार सुरू असल्याचे त्यांनी गुरुवारी सांगितले. कोरोनामुळे आधी २९ मार्च आणि नंतर १५ एप्रिलला नियोजित असलेली आयपीएल सध्या अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. आॅस्ट्रेलियात आयोजित टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द झाली, तर भारतात आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएलचे आयोजन करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
बीसीसीआयकडून सर्व पर्यायांची चाचपणी सुरू आहे. जरी प्रेक्षकांविना सामने खेळवण्याची वेळ आली तरीही चालेल. चाहते, संघ व्यवस्थापन, खेळाडू, ब्रॉडकास्टर्स, प्रायोजक आणि समभागधारक सारेच आयपीएल २०२० च्या आयोजनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडे भारतीय आणि विदेशी खेळाडूंनी आयपीएल खेळण्याबाबत उत्सुक असल्याचे म्हटले होते. ‘आम्ही आशावादी आहोत, बीसीसीआय आयपीएलच्या आयोजनासंदर्भात निर्णय घेईल,’ असे गांगुली म्हणाले. (वृत्तसंस्था)
बीसीसीआय स्थानिक वेळापत्रकावरदेखील काम करीत आहे. रणजी करंडक, दुलिप करंडक, विजय हजारे करंडक यासारख्या स्पर्धा व्यावहारिक असाव्यात, यावर भर दिला जात आहे. या स्पर्धांमध्ये खेळाडूंचा सहभाग निश्चित व्हावा, स्पर्धांमध्ये चमक दाखविणाऱ्या खेळाडूंना देशासाठी खेळण्याची संधी मिळावी, यादृष्टीने सर्व उपाय योजले जात असल्याचे सांगून गांगुली यांनी याविषयी दोन आठवड्यात माहिती उपलब्ध करून दिली जाईल, असे सांगितले.
बीसीसीआय सर्व राज्य संघांमध्ये क्रिकेट सुरू करण्यासाठी नियमावली तयार करीत आहे. त्यात खेळाडू, स्टाफ आणि अधिकाऱ्यांची सुरक्षा आणि आरोग्याची काळजी घेण्यात येईल. बीसीसीआय अनुदान देण्याबाबतही गंभीरपणे काम करीत आहे. ज्या संघटनांनी अनुदान वापरासाठी दस्तऐवज जमा केले त्यांना अनुदान रक्कम देण्यात आली असून उर्वरित राज्य संघटनांनी दस्तावेज जमा केल्यास त्यांनाही रक्कम दिली जाणार आहे.
कुठल्याही बदलाविना व्हावे आयोजन - केकेआर
कोलकाता: कोरोना व्हायरसमुळे अस्ताव्यस्त झालेल्या क्रिकेट वेळापत्रकात विंडो शोधून आयपीएल आयोजन करण्याच्या नादात या स्पर्धेतील बदल आम्हाला मान्य नसतील, असा इशारा कोलकाता नाईट रायडर्सचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी दिला.आयपीएलचे आयोजन आधीसारख्या पूर्ण फॉर्मेटसह व्हावे, असे सर्वच फ्रेन्चायसींना वाटत असल्याचे वेंकी म्हणाले. यंदा आयोजन होईल की नाही हे निश्चित नसले तरी विश्वचषक रद्द झाल्यास आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएल होण्याची शक्यता पडताळण्यात येत आहे.व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत वेंकी म्हणाले, ‘आयपीएलच्या वेळापत्रकात आणि आयोजनात कुठलीही छेडछाड आम्हाला मान्य नाही. ही स्पर्धा आधीसारख्या पूर्ण फॉर्मेटसह व्हावी, असे सर्वांना वाटते. सामन्यांची संख्या जितकी असेल तितकीच असावी शिवाय सर्व खेळाडूंचाही समावेश असावा.’ सध्या प्रवास निर्बंध असल्याने आयपीएल केवळ भारतीय खेळाडूंच्या सहभागाने व्हावे आणि सामन्यांची संख्या कमी करण्यात यावी, असा प्रस्ताव बीसीसीआयमधील अनेक पदाधिकाºयांनी दिला आहे.
Web Title: IPL in an empty stadium
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.