Indian Premier League 2024 - आयपीएलचे १७वे पर्व सुरू आहे आणि राजस्थान रॉयल्स हा आतापर्यंत अपराजित राहिलेला एकमेव संघ आहे. कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद यांची कामगिरीही चांगली झालेली पाहायला मिळतेय. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स यांचा संघर्ष सुरूच आहे. या मोसमात दमदार कामगिरी करून पुढील हंगामासाठी होणाऱ्या मेगा लिलावात आपली मागणी वाढविण्याकडे खेळाडूंचे लक्ष लागले आहे. या वर्षाच्या अखेरीस आयपीएल २०२५ चा मेगा लिलाव होणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक संघाचे चित्र बदलेल. पण, या मेगा लिलावात मोठे खेळाडू क्वचितच दिसणार आहेत, कारण फ्रँचायझीने BCCI कडे तशी मागणीच केली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, BCCI वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या मेगा लिलावात रिटेन केलेल्या खेळाडूंची संख्या वाढविण्याचा विचार करत आहे. आयपीएल फ्रँचायझींकडून असा सल्ला मिळाला आहे. बोर्डाने अहमदाबादमध्ये बैठकीसाठी सर्व फ्रँचायझींच्या मालकांना आमंत्रणे पाठवली आहेत. ''गोष्टी अद्याप प्राथमिक टप्प्यावर आहेत. बोर्ड लीग पुढे नेण्यासाठी नवीन कल्पना शोधत आहे. खेळाडू रिटेन करणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अनौपचारिक चर्चेत, बहुतेक फ्रँचायझी लिलावापूर्वी ८ खेळाडूंना कायम ठेवण्याच्या बाजूने आहेत,''असे सूत्रांनी सांगितले.
मागील मेगा ऑक्शनमध्ये फ्रँचायझींना चार खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती आणि ते राईट टू मॅच कार्ड वापरून एक खेळाडू जोडू शकत होते. यामुळे फ्रँचायझींना एकूण ५ खेळाडू कायम ठेवण्याची संधी मिळाली, त्यापैकी दोन परदेशी खेळाडू असायला हवे होते. बहुतेक फ्रँचायझींना वाटते की संघ रचनेतील सातत्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोअर टीम पुन्हा पुन्हा तोडण्यात काही अर्थ नाही. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसह मागील मेगा ऑक्शनमध्ये अनेक संघांना अडचणींचा सामना करावा लागला होता.
कॅपिटल्सने एक मजबूत संघ तयार केला होता, ज्यांनी २०२० मध्ये अंतिम फेरी गाठली होती, परंतु नंतर मेगा लिलावात चार खेळाडू कायम ठेवण्याच्या नियमामुळे, कॅपिटल्सला आपले बरेच खेळाडू रिलीज करावे लागले. या नियमाला विरोध असू शकतो कारण काही फ्रँचायझींना त्यांचा संघ मजबूत करण्यासाठी लिलावात खेळाडूंचा मोठा समूह हवा आहे. मोठी नावे हवी आहेत. लीगमध्ये १० संघ आहेत आणि आता राखून ठेवलेल्या खेळाडूंची संख्या वाढल्यास मोठ्या खेळाडूंचा पूल खूपच लहान होईल.