भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS DHONI ) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येतो. पण, काल धोनीच्या फेसबुक पोस्टने चाहत्यांची झोप उडवली आहे. ''नवीन पर्वाची आतुरतेनं वाट पाहतोय... आणि नवीन भूमिकेचीही...'',अशा आशयाची धोनीची पोस्ट होती. आता नवीन भूमिका कोणती, याची सर्वांना उत्सुकता आहे. त्यात इंडियन प्रीमियर लीग कशामुळे मनोरंजक बनते? या प्रश्नावर धोनीने त्याचं मत मांडले आहे.
२००८ मध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करणाऱ्या धोनीने IPL ही जगातील पहिली फ्रँचायझी लीग ते सर्वात जास्त पाहिल्या गेलेल्या क्रिकेट स्पर्धांपैकी एक बनताना पाहिली आहे. धोनीच्या मते, एकाच संघात जगातील सर्व भागांतील खेळाडूंचा मिळणारी संधी ही या लीगला मनोरंजक करते. आजपर्यंत विक्रमी सहा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या धोनीने चेन्नई सुपर किंग्सचे चांगल्या व वाईट नेतृत्व केले आहे. आयपीएल २०२४ हे कदाचित त्याचे शेवटचे पर्व असेल आणि तो शेवटच्या वेळी CSK चे नेतृत्व करताना दिसेल.
आयपीएल २०२४ च्या आधी, स्टार स्पोर्ट्सने त्याच्या सोशल मीडिया चॅनेलवर जारी केलेल्या स्निपेटमध्ये धोनीने आयपीएलला काय खास बनवते याची आठवण करून दिली. धोनीने २००८ मधील CSK बॅचचे उदाहरण दिले.
''२००८ मध्ये खेळलेला चेन्नई संघ एक संतुलित संघ होता. संघात मॅथ्यू हेडन, माइक हसी, मुथय्या मुरलीधरन, मकाया एनटिनी, जेकब ओरम यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा मोठा समूह होता. या सर्वांना एकाच ड्रेसिंग रूममध्ये एकत्र आणणे, एकमेकांना ओळखणे हे आव्हान होते. जेव्हा तुम्ही एखाद्या संघाचे नेतृत्व करत असता, तेव्हा तुम्ही एकमेकांना समजून घ्यायला हवे, हा माझा विश्वास होता. एकदा तुम्ही व्यक्तीला ओळखले की, तुम्हाला त्याची ताकद, त्याच्या कमकुवतपणाची जाणीव झाली की, संघ म्हणून योग्य दिशेने वाटचाल करणे सोपे होते ,” असे धोनी म्हणाला.