नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. मंगळवारी या स्पर्धेत यजमान ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये सामना पार पडला. ऑस्ट्रेलियाने शानदार विजय मिळवून आशियाई चॅम्पियन श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करून यजमान संघाला विजयासाठी १५७ धावांचे आव्हान दिले होते. ज्याचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने केवळ १६.३ षटकांत पूर्ण केला. ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीसमोर श्रीलंकेने साजेशी खेळी करत २० षटकांत ६ बाद १५७ धावा उभारल्या. अखेर ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टॉयनिसने घातक फलंदाजी करून श्रीलंकेच्या गोलंदाजांना घाम फोडला. सामन्याचा हिरो ठरलेल्या स्टॉयनिसने आपल्या शानदार खेळीचे श्रेय आयपीएलला दिले.
दरम्यान, श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान संघाची सुरूवात निराशाजनक झाली होती. परंतु ग्लेन मॅक्सवेल व मार्कस स्टॉयनिस यांनी ऑस्ट्रेलियाला दणदणीत विजय मिळवून दिला. न्यूझीलंडकडून दारूण पराभव पत्करावा लागलेल्या ऑसींनी मंगळवारी घरच्या चाहत्यांना खूश केले. मॅक्सवेल १२ चेंडूंत २३ धावा करून माघारी परतल्यानंतर स्टॉयनिसचे वादळ घोंगावले आणि त्याने चौकार-षटकारांची आतषबाजी केली. मार्कस स्टॉयनिसने केवळ १८ चेंडूत नाबाद ५८ धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. तर मार्कस स्टॉयनिसने ऑस्ट्रेलियाकडून सर्वात कमी चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा विक्रम देखील केला आहे.
IPL नं माझं क्रिकेट बदललं - स्टॉयनिस "होय, निश्चितपणे आयपीएलने माझे क्रिकेट बदलले आहे आणि मला खेळात विकसित होण्यास मदत केली आहे. कारण तिथे मी केवळ खेळपट्टीवर खेळत नाही तर तिथे जगभरातील प्रशिक्षकांसह विविध देशांच्या खेळाडूंसोबत खेळायला मिळते." अशा शब्दांत स्टॉयनिसने आपला खेळ सुधारण्यास आयपीएलची मदत झाली असल्याचे सांगितले. खरं तर आयपीएलच्या मागील हंगामात स्टॉयनिस गुजरात टायटन्सच्या संघाचा हिस्सा होता. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात या संघाने आपल्या पहिल्याच हंगामात आयपीएलचा किताब जिंकला आहे.
स्टॉयनिसच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय“मी काही वर्षे आयपीएलमध्ये आणि काही संघांमध्ये खेळलो आहे, त्यामुळे तुम्हाला स्पिन कसे खेळायचे याबद्दल अनेक बाबी समजतात. त्यामुळेच मला खेळात प्रगती करण्यास मदत झाली. मी सुरूवातीला खूप घाबरलो होतो, त्यामुळे खेळावर प्रभाव टाकायचा आणि कदाचित सहकाऱ्यांना ऊर्जा मिळावी यासाठी आपण आक्रमक व्हायला हवे असा माझा हेतू होता", असे स्टॉयनिसने अधिक म्हटले. स्टॉयनिसच्या खेळीने ऑस्ट्रेलियाला केवळ पुनरागमनाचा विजय मिळवून दिला नाही तर त्यांचा नेट रनरेट वाढवण्यातही मदत केली. कारण सलामीच्या सामन्यात यजमान संघाला न्यूझीलंडकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"