नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगचे १३ वे सत्र कधी होईल, याविषयी शंका कायम आहे. कोरोनामुळे आयपीएल स्थगित असले तरी यंदा कधी तरी ही स्पर्धा घ्यायचीच, याबाबत बीसीसीआयने कंबर कसली आहे. स्पर्धेचे आयोजन भारतात की विदेशात करायचे, यावरून बोर्डात विविध विचारप्रवाह काम करीत आहेत. कार्यकारिणीतील काही जण भारतातच आयोजनाच्या बाजूने आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या नकारात्मकतेवर मात करण्यासाठी आयपीएल रामबाण औषध ठरेल, असे त्यांना वाटते. दुसरीकडे काही जण गरजेनुसार स्पर्धेचे आयोजन विदेशात हलविण्याच्या बाजूने दिसतात. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानुसार आयपीएल भारतातच व्हावे, अशी सर्वसाधारण धारणा आहे. दुसरीकडे परिस्थितीचा विचार करता गरजेनुसार विदेशात आयोजन करण्यावर काही पदाधिकारी भर देत आहेत.
खेळाडू, प्रेक्षकांची सुरक्षा महत्त्वपूर्ण
हा अधिकारी म्हणाला, ‘आयपीएल आयोजनास प्राधान्य देणारा गट आयोजन विदेशात घेऊन जाण्याच्या मताचा आहे. अशावेळी सर्व पर्यायांचा विचार करायचा तर सध्या तरी आयोजन स्थळ लक्षात घ्यायलाच हवे. खेळाडूंची सुरक्षा आणि सामना पाहणाऱ्यांची सुरक्षा या गोष्टींना प्राधान्यक्रम द्यावा लागेल.’ दुसरीकडे फ्रेन्चायसी अधिकाºयाच्या मते, भारतात आयोजनास प्रथम पसंती असावी.
वेतन कपात, ले-आॅफ नाही
क्रीडा आयोजन ठप्प असल्यामुळे जगातील अन्य बोर्डाप्रमाणे बीसीसीआयलादेखील मोठे नुकसान झाले. यंदा आयपीएल होऊ न शकल्यास चार हजार कोटीचे नुकसान होईल, असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आधी सांगितलेच आहे. बोर्डाचा खर्च कमी करण्याची तयारी करण्यात आली असली तरी अद्याप वेतन कपात किंवा ले-आॅफसारख्या गोष्टींचा अवलंब केला नसल्याचे स्पष्टीकरण बोर्डाचे कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी दिले. प्रवास, आदरातिथ्य आणि अन्य गोष्टींवर होणारा खर्च टाळण्याचे बीसीसीआयने ठरवले आहे. आयपीएल आयोजन न झाल्यास मोठा निर्णय घेण्याआधी आम्ही परिस्थितीचा आढावा घेणार आहोत, असे धुमल यांनी सांगितले.
आयपीएल आयोजन यूएईत ?
दुबई: भारताने यंदा आयपीएल आयोजन विदेशात करण्याची तयारी दर्शवल्यास आम्ही यजमानपद भूषवू शकतो, असे अमिरात क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार यूएई क्रिकेट बोर्डाचे महासचिव मुबाशिर उस्मानी यांनी आयपीएल आयोजनाची भारताने इच्छा दर्शविली तर आम्ही तयार असू, असे म्हटले आहे.
Web Title: IPL in India or abroad? corona
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.