नवी दिल्ली : यंदाचा आयपीएलचा मोसम संपला. चेन्नई सुपर किंग्जने जेतेपद पटकावले. आता पुढच्या वर्षी आयपीएल कधी सुरु होणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. पुढच्या वर्षी भारतामध्ये निवडणुका होणार आहेत, त्याचबरोबर क्रिकेट विश्वचषकही खेळवला जाणार आहे. हे सारे पाहता पुढच्या वर्षी आयपीएल २९ मार्चपासून सुरु होईल, अशी माहिती बीसीसीआयमधील सूत्रांनी दिली आहे.
लोढा समितीच्या नियमांनुसार दोन स्पर्धांमध्ये १५ दिवसांचा अवधी असणे बंधनकारक आहे. क्रिकेट विश्वचषकाला ३० मे पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे विश्वचषकापूर्वी जर आयपीएल खेळवायची असेल तर २९ मार्च हीच तारीख योग्य असल्याचे म्हटले जात आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलबाबत सांगितले की, " भारतामध्ये निवडणूका कधी होणार, याकडे बीसीसीआयचे लक्ष आहे. कारण निवडणुकांच्या काळामध्ये आयपीएल खेळवणे सोपे नसेल. जर दोन्ही गोष्टी एकाच वेळेला होत असतील तर आयपीएल देशाबाहेर खेळवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पण आयपीएलमधील संघ मालकांना आयपीएल परदेशापेक्षा भारतामध्येच खेळवणे उचित वाटत आहे. त्यामुळे आयपीएल भारतामध्ये कशी खेळवली जाऊ शकते, याचा विचार सध्या बीसीसीआय करत आहे. "