Rohit Sharma Press Conference ahead T20I series against WI : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी झालेल्या लिलावात २०४ खेळाडूंवर ५५१ कोटी ७० लाख रुपयांची उधळण झाली. यावेळेत सर्व फ्रँचायझींनी भविष्याचा विचार करून भारतीय खेळाडूंवरच अधिक भर दिला. त्यामुळे इशान किशन, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, शाहरुख खान, आवेश खान, वॉशिंग्टन सुंदर आदी भारतीय खेळाडू मालामाल झाले. त्यामुळे भारतीय खेळाडू जरा हवेतच आहेत आणि मोठमोठी स्वप्न नक्कीच पाहत असतील. पण, या सर्वांना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने भानावर आणले आहे.
१६ तारखेपासून India vs West Indies T20I series सुरू होत आहे आणि त्याआधीच भारताला तीन धक्के बसले आहेत. लोकेश राहुल, अक्षर पटेल यांच्यापाठोपाठ वॉशिंग्टन सुंदर यानेही काल दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतली. त्यांच्या जागी निवड समितीने कुलदीप यादव, ऋतुराज गायकवाड व दीपक हुडा यांची ट्वेंटी-२० संघात निवड केली आहे. मालिकेला सुरुवात होण्याआधी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने सर्व युवा खेळाडूंना भानावर आणले आहे. या पत्रकार परिषदेत रोहितला इशान किशनबाबत विचारण्यात आले. मुंबई इंडियन्सने त्याला १५.२५ कोटींत आपल्या ताफ्यात पुन्हा घेतले आहे.
रोहित म्हणाला,''IPL आपण फक्त २ महिने खेळतो आणि उर्वरित १० महिने आपण भारतासाठी खेळतो. त्यामुळे आता राष्ट्रीय कर्तव्यावर आहे आणि येथे IPL विचार केला जाणार नाही. भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करण्यावर लक्ष द्या. आयपीएल ऑक्शनमध्ये बरेच चढ-उतार झाले, हे मलाही समजतेय.. काल आमची मीटिंग झाली आणि त्यात मी सर्वांना आता लक्ष्य ब्लू जर्सी, असे सांगितले. अखेर हा भारताचा प्रश्न आहे, तिथे दुसरा विचारच चालणार नाही. ''
तो पुढे म्हणाला,''आपल्याकडून जगभरातील चाहत्यांच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे संघात जे बदल करावे लागतील ते करणार... वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्वोत्तम खेळाडू निवडणे, हा त्यामागचा हेतू आहे. त्यामुळे या संघात कोणाची जागा पक्की आहे किंवा नाही, हे मलाही आत्ताच नाही माहित. व्यग्र वेळापत्रक आहे आणि दुखापतीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांना समान संधी देण्याची गरज आहे. ''
Web Title: IPL is played for 2 months, rest 10 months we play for India Rohit Sharma on Ishan Kishan and On dealing with emotions of IPL auction 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.