Join us  

IPL बेस्टच! भारतीय संघाच्या खराब कामगिरीला आयपीएलला जबाबदार धरणे चुकीचे - गौतम गंभीर

क्रीडा व युवक कल्याण समितीतर्फे शनिवारी नवी दिल्लीत मोठा कार्यक्रम झाला आणि यावेळी भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 9:40 AM

Open in App

क्रीडा व युवक कल्याण समितीतर्फे शनिवारी नवी दिल्लीत मोठा कार्यक्रम झाला आणि यावेळी भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याने इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL) गुणगान गायले. कोलकाता नाइट रायडर्सचा माजी कर्णधार असलेल्या गौतम गंभीरने दोन आयपीएल जेतेपदं पटकावली आहेत. आयपीएलने भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला आणि मागील अनेक वर्ष त्याचा अनेक राज्यांच्या क्रिकेट विकासालाही फायदा झाल्याचे त्याने म्हटले. 

''भारतीय क्रिकेटमध्ये घडलेली आयपीएल ही सर्वोत्तम गोष्ट आहे. मी हे सर्व गोष्टींच्या अनुशंगाने बोलतोय. आयपीएलला सुरुवात झाल्यापासून त्यावर बरीच टीका करण्यात आली. भारतीय संघाची कामगिरी खराब झाली की प्रत्येकवेळी आयपीएलला जबाबदार ठरवले जाते... हे अयोग्य आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये आपण चांगली कामगिरी करत नाही, तर त्यासाठी खेळाडूंवर टीका करा, कामगिरी न करणाऱ्यावर टीका करा, परंतु आयपीएलकडे बोट दाखवणे चुकीचे आहे,''असे गंभीर म्हणाला.

आयपीएलमुळे खेळाडूंना आर्थिक सुरक्षितता मिळाली आणि ग्रासरुट लेव्हलवर अधिक खेळाडू घडविण्यासाठी मदत झाली, असे गंभीर म्हणाला. ''३५-३६ वर्षांचा असेपर्यंतच खेळाडू कमवतो.  आयपीएल आर्थिक सुरक्षा प्रदान करते जे तितकेच महत्त्वाचे आहे. भारतीय क्रिकेटमध्ये घडलेली एक चांगली गोष्ट म्हणजे भारतीयांनी आता राष्ट्रीय क्रिकेट संघाला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.   संघाचे प्रशिक्षक भारतीय असले पाहिजेत असे माझे ठाम मत आहे. हे सर्व परदेशी प्रशिक्षक, ज्यांना आम्ही खूप महत्त्व दिले ते पैसे कमावण्यासाठी इथे येतात आणि मग ते गायब होतात. खेळात भावना महत्त्वाच्या असतात. भारतीय क्रिकेटबद्दल फक्त तेच लोक भावूक होऊ शकतात ज्यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे,''असेही गंभीर म्हणाला.

"मी लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर आहे. मला एक गोष्ट बदलायची आहे की मला सर्व भारतीय प्रशिक्षकांना आयपीएलमध्ये पाहायचे आहे. कारण बिग बॅश किंवा इतर कोणत्याही परदेशी लीगमध्ये कोणत्याही भारतीय प्रशिक्षकाला संधी मिळत नाही. भारत क्रिकेटमध्ये महासत्ता आहे, पण आमच्या प्रशिक्षकांना कुठेही संधी मिळत नाही. सर्व परदेशी येथे येतात आणि उच्च नोकर्‍या मिळवतात. आम्ही इतर लीगपेक्षा अधिक लोकशाही आणि लवचिक आहोत. आम्हाला आमच्याच लोकांना अधिक संधी देण्याची गरज आहे," तो पुढे म्हणाला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

  

टॅग्स :गौतम गंभीरआयपीएल २०२२भारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App