KKR Appointed Dwayne Bravo As Their Mentor IPL 2025 : वेस्ट इंडिजचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो आता केकेआरच्या जर्सीत दिसेल. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाआधी शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रँचायझीने मोठा डाव खेळत ब्राव्होला आपल्या ताफ्यात घेतले. गतविजेत्या केकेआरच्या संघाने माजी कॅरेबियन खेळाडू ड्वेन ब्राव्होची संघाच्या मेंटॉरच्या रुपात नियुक्ती केली आहे. त्याने नुकतीच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. आता आयपीएलमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात गौतम गंभीरच्या जागी काम करताना दिसेल. आता ब्राव्होने त्याच्या माजी संघाचे अर्थात चेन्नई सुपर किंग्जचे आणि सीएसकेच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.
ड्वेन ब्राव्हो हा आयपीएलशिवाय अन्य संघांच्या माध्यमातूनही नाईट रायडर्सशी कनेक्ट राहिल. कॅरेबियन लीगमधील त्रिनिबागो नाईट रायडर्स (CPL), लॉस एंजेलिस नाईट रायडर्स (MLC) आणि अबु धाबी नाईट रायडर्स (IL टी20) या संघाची जबाबदारीही त्याच्याकडे सोपवण्यात आली आहे. केकेआरच्या संघाचा भाग होताच ब्राव्होने एक भावनिक विधान केले.
ब्राव्होचे भावनिक विधानब्राव्हो म्हणाला की, गुपित ठेवण्यासारखे काहीच नाही आता सर्वांपर्यंत बातमी पोहोचली आहे. मी केकेआरच्या मेंटॉरपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी चेन्नई सुपर किंग्जची फ्रँचायझी आणि त्यांच्या व्यवस्थापनाचे आभार मानू इच्छितो. चेन्नईतील माझे चाहते आणि जगभरातील CSK चाहत्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. त्यांनी असेच आशीर्वाद आणि पाठिंबा द्यावा असे आवाहन करतो. मला माहित आहे की तुमच्यासाठी हा एक दुःखाचा क्षण आहे. पण, मी जे काही करतो त्यामध्ये मला पाठिंबा देणे सुरू ठेवा. लवकरच भेटू, असे त्याने चेन्नईच्या चाहत्यांचे आभार मानताना म्हटले. ड्वेन ब्राव्हो हा आयपीएलमध्ये तीन फ्रँचायझींकडून खेळताना दिसला आहे. यात त्याने गुजरात लायन्सशिवाय मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ब्राव्हो चार वेळचा आयपीएल चॅम्पियन खेळाडू आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दोन्ही संघाकडून खेळताना तो चॅम्पियन ठरला होता. २०२४ च्या हंगामात तो धोनीच्या संघाच्या बॉलिंग कोचच्या रुपात दिसला होता.