नवी दिल्ली : बायोबबल भेदून खेळाडूंच्या गोटात कोरोनाने शिरकाव करताच २९ सामने झाल्यानंतर आयपीएलचे १४ वे पर्व अनिश्चित काळासाठी नुकतेच स्थगित करण्यात आले. कोरोनापुढे बायोबबल अपयशी का झाले यावरुन बीसीसीआयवर टीका होत असताना नवी माहितीपुढे आली. आयपीएल सुरू होण्याआधी अनेक खेळाडूंनी कोरोनाची लस घेण्यास नकार दिला होता.
‘सर्व आठ संघांना कोरोनाची लस घेण्यास सांगण्यात आले तेव्हा अनेक खेळाडूंनी त्याला नकार दिला होता. ही कोणत्याही प्रकारची चूक नव्हती, तर पुरेशी जागरुकता नव्हती. वृत्तानुसार खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना या संदर्भात फार कमी माहिती होती. खेळाडूंना वाटले की ते बायोबबलमध्ये सुरक्षित असतील आणि लस घेण्याची गरज नाही. याबाबत संघ व्यवस्थापनांकडून देखील दबाव टाकण्यात आला नव्हता. अचानक सर्व गोष्टी हाताबाहेर गेल्या. सामने स्थगित झाल्यानंतर मात्र अनेक भारतीय खेळाडूंनी लस घेतली. भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाने कोरोनाची पहिली लस घेतली. त्यानंतर विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, ईशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, दीपक चहर आदींनी लस घेतली.