ललित झांबरे
फाफ डू प्लेसिससारख्या (Faf Du Plessis) खेळाडूलाही ड्रिंक्स न्यावे लागले, बेंचवर बसावं लागलंय, तेंव्हा त्याची ही अवस्था बघून वाईट वाटायचं, आता मी त्याच स्थितीतून जातोय, अशा शब्दात लेगस्पिनर इम्रान ताहीरने (Imran Tahir) चेन्नईच्या (CSK) संघातर्फे यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) एकाही सामन्यात खेळायची संधी मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. गेल्यावर्षीच्या आयपीएलमध्ये चेन्नईसाठी सर्वच्या सर्व 17 सामने खेळून याच इम्रान ताहीरने 26 विकेट काढल्या होत्या आणि पर्पल कॅप (Purple Cap) जिंकली होती पण यंदा चेन्न्ईने 10 सामन्यात त्याला संधीच दिलेली नाही.
त्यामुळे आयपीएलमध्ये 79 विकेट नावावर असणाऱ्या या गोलंदाजाला निराशा येणे स्वाभाविक आहे पण आयपीएल 2020 मध्ये अशी एकाही सामन्याची संधी न मिळालेला तो एकटाच खेळाडू नाही तर पूर्ण संघच्या संघ तयार होईल एवढे खेळाडू आहेत. 'अनप्लेयड टीम' असा हा संघ म्हणता येईल.
आयपीएल 2020 च्या या अनप्लेयड संघात इम्रान ताहीरशिवाय आरसीबीचा दिग्गज पार्थिव पटेल, मुंबई इंडियन्सचे ख्रिस लीन, अनमोल प्रीत सिंग, शेरफेन रुदराफोर्ड व धवल कुलकर्णी, राजस्थान रॉयल्सचा मनन व्होरा, केकेआरचा सिध्देश लाड, किंग्ज इलेव्हनचा तेजिंदरसिंग धिल्लन व इशान पोरेल आणि सीएसकेचे मिशेल सँटनर, के.एम.आसिफ, मोनुकुमार व साई किशोर हे आहेत. या यादीत कालपर्यंत सनरायजर्सचा जेसन होल्डरसुध्दा होता पण त्याला गुरुवारी राजस्थान रॉयल्सविरुध्द संधी देण्यात आली. ख्रिस लीन हा गेल्यावर्षी केकेआरच्या संघात होता. त्याचा स्ट्राईक रेट 140.66 व सरासरी 33.68 ची असली तरी मुंबईने त्याला बाहेरच बसवलेले आहे.
बऱ्याच संघाकडून आयपीएल खेळलेला पार्थिव पटेलच्या नावावर 2800 च्या वर धावा आहेत पण आरसीबीने त्याला संधी दिलेली नाही. कदाचित देवदत्त पडीक्कल याचा उदय हे त्याचे कारण असेल. दुसरा विरेंद्र सेहवाग मानला जाणारा मनन व्होरा हा राजस्थान रॉयल्सच्या बेंचवरच बसुन आहे. अनप्लेड खेळाडूंमध्ये त्याच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा असल्या तरी रॉयल्सने त्याला पसंती दिलेली नाही. सिध्देश लाडला तब्बल पाच वर्ष मुंबई इंडियान्सच्या संघात असूनही संधी मिळाली नव्हती. गेल्या मोसमात तो एकच सामना खेळल्यावर आता केकेआरच्या संघात आहे पण तिकडेही त्याची प्रतीक्षा सुरुच आहे.
वेस्ट इंडिजचा शेरफेन रुदरफोर्ड हा फटकेबाजीसाठी प्रसिध्द आहे, गेल्या वर्षी दिल्लीने त्याला सात सामने खेळवले. यंदा मुंबईने मात्र त्याला आतापर्यंत सांधी दिलेली नाही. ऑफ स्पिनर तैजिंदरसिंग धिल्लन हा बऱ्यापैकी फलंदाजही आहे पण ते दाखवून देण्याची संधी त्याला कींग्ज इलेव्हनकडून मिळालेली नाही. इशान पोरेल हा गोलंदाजीत चमकेल असे वाटत होते पण मोहम्मद शामी व अर्शदीप संघात असल्याने त्याला किंग्ज इलेव्हनने आतापर्यंत तरी बाहेरच बसवलेले आहे. धवल कुलकर्णी हा मुंबईचा अनुभवी खेळाडू पण यंदा रोहितला त्याची अद्याप गरज भासलेली नाही.
मिशेल सँटनर...न्यूझीलंडचा हा ऑफस्पिनर टी-20 मध्ये नंबर वन गोलंदाज असला तरी सीएसकेच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा करु शकलेला नाही. इम्रान ताहीरला संधी नाही तेथे सँटनरला कुठून मिळणार. कदाचित कर्ण शर्मा, पियुष चावला व रवींद्र जडेजा यांच्यामुळे इम्रान व सँटनरला संधी मिळाली नसावी. पण ही यादी इम्रान ताहीरला दिलासा नक्कीच देईल.
Web Title: IPL Match 2020: 'This' is the team of 'Unplayed' players of IPL 2020
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.