CSK vs RCB Match Live Updates | चेन्नई: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळख असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने आपला दबदबा कायम ठेवण्यात यश मिळवले. (IPL 2024 Live) आपल्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नमवून चेन्नई सुपर किंग्जने विजयी सलामी दिली. (CSK vs RCB Live) चेन्नईत झालेल्या या सामन्यात पुन्हा एकदा यजमान संघाने बाजी मारली. लक्षणीय बाब म्हणजे आयपीएलच्या इतिहासात फक्त एकदा आरसीबीने सीएसकेला चेन्नईच्या धरतीवर पराभूत केले आहे. सलामीचा सामना जिंकून चेन्नईने आपला विजयरथ कायम ठेवला आहे. बंगळुरूने दिलेल्या १७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांनी १८.४ षटकांत ४ बाद १७६ धावा करून विजय साकारला. (CSK Beat RCB)
आव्हानाचा पाठलाग करत असताना सीएसकेला कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या रूपात सुरुवातीलाच मोठा झटका बसला. पण, त्यानंतर रचिन रवींद्र आणि अजिंक्य रहाणे यांनी मोर्चा सांभाळला. या जोडीने साजेशी खेळी केल्यानंतर डाव पुढे नेण्याची जबाबदारी शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनी घेतली. अखेर सांघिक खेळीच्या जोरावर चेन्नईने ६ गडी राखून विजय संपादन केला.
CSK ची सांघिक खेळी
चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड (१५), रचिन रवींद्र (३७), अजिंक्य रहाणे (२७), डॅरिल मिचेल (२२), शिवम दुबे (३४ नाबाद) आणि रवींद्र जडेजाने नाबाद (२५) धावा केल्या. आरसीबीकडून कॅमरून ग्रीन तर आणि यश दयाल आणि कर्ण शर्मा यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
दरम्यान, संघ अडचणीत असताना दिनेश कार्तिकने आपल्या अनुभवाचा फायदा घेत संयमी खेळी केली, त्याला अनुज रावतने मोलाची साथ दिली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून फाफ डुप्लेसिस (३५), रजत पाटीदार (०), ग्लेन मॅक्सवेल (०), कॅमरून ग्रीन (१८) आणि विराट कोहलीने (२१) धावा केल्या. याशिवाय अनुज रावतने (४८) आणि दिनेश कार्तिकने नाबाद (३८) धावा कुटल्या. ११.४ षटकांत आरसीबीची धावसंख्या ५ बाद केवळ ७८ धावा अशी होती. संघ अडचणीत असताना दिनेश कार्तिक आणि अनुज रावत यांनी डाव पुढे नेला. या जोडीने ५० चेंडूत ९५ धावा केल्या. चेन्नईकडून मुस्तफिजुरने सर्वाधिक ४ बळी घेतले. त्याने ४ षटकांत ३० धावा देत ही किमया साधली. आरसीबीने चेन्नईला विजयासाठी १७४ धावांचे आव्हान दिले होते, ज्याचा गतविजेत्यांनी सहज पाठलाग केला.
चेन्नईचा संघ -
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डेरिल मिचेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दीपक चाहर, महेश तीक्ष्णा, मुस्तफिजुर रहमान आणि तुषार देशपांडे.
बंगळुरूचा संघ -
फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंत डागर आणि मोहम्मद सिराज.
Web Title: Ipl Match 2024 live score csk vs rcb Chennai Super Kings beat Royal Challengers Bangalore by 4 wickets and 8 balls to spare
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.