CSK vs RCB Match Live Updates | चेन्नई: आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात झाली असून सलामीच्याच सामन्यात बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांने चमकदार कामगिरी केली. चार दिवसांपूर्वी स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर गेलेल्या मुस्तफिजुर रहमानने शुक्रवारी मैदान गाजवले. (CSK vs RCB) आयपीएल २०२४ च्या सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ भिडले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना फाफ डुप्लेसिसने अप्रतिम फलंदाजी करत चांगली सुरुवात केली. (IPL 2024 Live) आरसीबीची पकड मजबूत होत असताना कर्णधार ऋतुराज गायकवाडने मुस्तफिजुरच्या हाती चेंडू सोपवला. आपल्या कर्णधाराच्या निर्णयाला योग्य ठरवत त्याने पहिल्याच षटकात दोन बळी घेतले. (Mustafizur Rahman 4 Wickets)
सेट फलंदाज फाफ डुप्लेसिस आणि रजत पाटीदार यांना मुस्तफिजुरने बाहेरचा रस्ता दाखवला. चार दिवसांपूर्वी गंभीर जखमी झालेला मुस्तफिजुर आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांना मुकणार असल्याची चर्चा होती. पण, तो सलामीच्या सामन्यात दिसला अन् चार बळी घेण्यात त्याला यश आले. चेन्नईकडून मुस्तफिजुरने सर्वाधिक ४ बळी घेतले. त्याने ४ षटकांत ३० धावा देत ही किमया साधली.
अलीकडेच बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात वन डे मालिका पार पडली. १८ मार्च रोजी मालिकेतील तिसरा सामना खेळवला गेला. या सामन्यात श्रीलंकेच्या डावाच्या ४२ व्या षटकात मुस्तफिजुर रहमानला गंभीर दुखापत झाली. त्याला अखेर स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. एकूणच चार दिवसांपूर्वी गंभीर जखमी झालेल्या बांगलादेशच्या या खेळाडूने चेन्नईसाठी शानदार कामगिरी केली. त्याने १० चेंडूत ४ बळी घेण्याची किमया साधली.
चेन्नईचा संघ -ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डेरिल मिचेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दीपक चाहर, महेश तीक्ष्णा, मुस्तफिजुर रहमान आणि तुषार देशपांडे.
बंगळुरूचा संघ - फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंत डागर आणि मोहम्मद सिराज.