CSK vs RCB Match Live Updates | चेन्नई: ज्या क्षणाची अवघं क्रिकेट विश्व वाट पाहत होतं तो क्षण अखेर आला असून आयपीएलच्या सतराव्या हंगामाला प्रारंभ झाला आहे. (CSK vs RCB Live) गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना होत आहे. सीएसकेचा संघ आपल्या घरात अर्थात चेन्नईत आरसीबीविरूद्ध मैदानात आहे. नवनिर्वाचित कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नईचे शिलेदार मैदानात आहेत.
आजच्या सामन्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच यजमान चेन्नईचा संघ प्रथम गोलंदाजी करेल. आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने म्हटले की, मी मोठ्या कालावधीनंतर चेपॉक स्टेडियमवर चेन्नईच्या चाहत्यांसमोर खेळत आहे. हे दृश्य पाहून खूप चांगले वाटते. तर ऋतुराज प्रथमच कर्णधारपद सांभाळत आहे. तो म्हणाला की, मी माझ्या परीने खेळण्यावर फोकस करतो. मी माही भाईसारखा (महेंद्रसिंग धोनी) वावरणार नाही. चेन्नईचे कर्णधारपद सांभाळणे ही अभिमानाची गोष्ट आहे. एकूणच धोनी दिग्गज असून मी त्याच्या परीने वावरू शकत नाही असे मराठमोळ्या ऋतुराजने म्हटले आहे.
आजच्या सामन्यासाठी CSK चा संघ -ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डेरिल मिचेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दीपक चाहर, महेश तीक्ष्णा, मुस्तफिजुर रहमान आणि तुषार देशपांडे.
आजच्या सामन्यासाठी RCB चा संघ - फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंत डागर आणि मोहम्मद सिराज.
दरम्यान, प्रथमच चेन्नईचा संघ ऋतुराजच्या नेतृत्वात खेळत आहे. कॅप्टन कूल धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने पाचवेळा ट्रॉफी जिंकली. याशिवाय सर्वाधिकवेळा अंतिम फेरीत प्रवेश करणारा संघ म्हणूनही चेन्नईच्या संघाची ख्याती आहे. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांनी सर्वाधिक पाचवेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाचवेळा किताब जिंकवून दिला. पण, मुंबईच्या फ्रँचायझीने रोहितला कर्णधारपदावरून काढून ही जबाबदारी हार्दिक पांड्यावर सोपवली आहे.