CSK vs RCB Match Live Updates | चेन्नई: चेन्नईच्या गडात जाऊन त्यांनाच पराभूत करण्यासाठी आरसीबीचा संघ मैदानात उतरला. (RCB vs CSK Live Match) आतापर्यंत चेपॉक स्टेडियमवर धोनीच्या शिलेदारांचा दबदबा राहिला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात झाली. (IPL live news) आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून यजमान चेन्नईच्या संघाला प्रथम गोलंदाजी करण्यास सांगितले. (IPL 2024 news)
मागील दोन महिन्यापासून क्रिकेटपासून दूर असलेल्या विराट कोहलीने आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. (Virat Kohli complete 12000 T20 runs) सुरुवातीपासून आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने स्फोटक खेळी केली. त्याने २३ चेंडूत ३५ धावा कुटल्या. घातक वाटणाऱ्या फाफला बाद करण्यात मुस्तफिजुर रहमानला यश आले. डावाच्या ४१ धावांवर आरसीबीने आपला पहिला गडी गमावला. रहमानने डुप्लेसिसला बाद करताच त्याच षटकात रजत पाटीदारला देखील बाहेरचा रस्ता दाखवला. पाटीदारला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर मॅक्सवेल देखील बाद झाला. पण विराटने संथ खेळी सुरू ठेवत मोर्चा सांभाळला पण त्यालाही जास्त काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. रचिन रवींद्र आणि अजिंक्य रहाणे यांनी अप्रतिम झेल घेऊन कोहलीला तंबूत पाठवले. पण, तत्पुर्वी रवींद्र जडेजाच्या पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर एक धाव काढून किंग कोहलीने ट्वेंटी-२० मध्ये १२ हजार धावांचा टप्पा गाठला.
विराट कोहली मागील दोन महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर होता. तो दुसऱ्यांदा बाबा होणार असल्यामुळे त्याने इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली होती. आयपीएलच्या सलामीच्या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी विराटच्या नावावर ट्वेंटी-२० मध्ये ११९९४ धावांची नोंद होती. पण, चेन्नईविरूद्धच्या सामन्यात ६ धावा करताच त्याने ऐतिहासिक कामगिरी केली. खरं तर तो १२ हजार ट्वेंटी-२० धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. या सामन्यापू्र्वी त्याने ३७६ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये ११९९४ धावा करण्याची किमया साधली होती.
ट्वेंटी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू-
- ख्रिस गेल - १४५६२ धावा
- शोएब मलिक - १३३६० धावा
- किरॉन पोलार्ड - १२९०० धावा
- ॲलेक्स हेल्स - १२३१९ धावा
- डेव्हिड वॉर्नर - १२०६५ धावा
- विराट कोहली - १२०१५ धावा
ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये गेलचा दबदबायुनिव्हर्सल बॉस म्हणून ओळख असलेला वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ख्रिस गेल स्फोटक खेळीसाठी प्रसिद्ध आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील त्याच्याच नावावर आहे. गेलने ४६३ सामन्यांमध्ये १४५६२ धावा केल्या आहेत. ट्वेंटी-२० मध्ये त्याच्या नावावर २२ शतके आणि ८८ अर्धशतकांची नोंद आहे. या यादीत पाकिस्तानचा शोएब मलिक दुसऱ्या स्थानावर असून १३३६० धावा केल्या आहेत. तर किरॉन पोलार्ड (१२९००) आणि ॲलेक्स हेल्स (१२३१९) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.