IPL 2024 GT vs MI Live Updates In Marathi | अहमदाबाद: मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील लढत नाना कारणांनी महत्त्वाची आहे. दोन्हीही संघ नवीन कर्णधारांच्या नेतृत्वात आहे. गुजरात टायटन्सचा माजी कर्णधार हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार बनला आहे, शुबमन गिल प्रथमच कर्णधापद सांभाळत आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. यजमान गुजरातने प्रथम फलंदाजी करताना साजेशी कामगिरी केली. सुरुवात चांगली झाल्यानंतर यजमानांच्या गाडीला जसप्रीत बुमराहने ब्रेक लावला. बूम बूम बुमराहने वृद्धीमान साहाचा त्रिफळा काढून गुजरातला पहिला झटका दिला. त्यानंतर शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी मोर्चा सांभाळला. पण त्याला अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकता आले नाही. गुजरातने निर्धारित २० षटकांत ६ बाद १६८ धावा केल्या.
कर्णधार हार्दिक पांड्याने पहिले षटक टाकून डावाची सुरुवात केली. बुमराहला चौथ्या षटकात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. या षटकातील अखेरचा चेंडू मुंबईला पहिला बळी देऊन गेला. गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक (४५) धावा केल्या, पण त्याला देखील बुमराहने आपल्या जाळ्यात फसवले. कर्णधार शुबमन गिल (३१), वृद्धीमान साहा (१९), अजमतुल्लाह उमरजई (१७), डेव्हिड मिलर (१२), राहुल तेवतियाने (२२) धावा केल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर गेराल्ड कोएत्झी (२) आणि पियुष चावलाला (१) बळी घेण्यात यश आले.
मुंबईचा संघ -हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, नमन धीर, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, शम्स मुलाणी, गेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड.
गुजरातचा संघ -शुबमन गिल (कर्णधार), वृद्धीमान साहा, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अजमतुल्लाह उमरजई, राशिद खान, उमेश यादव, साई किशोर आणि स्पेंसर जॉन्सन.
दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएची ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामासाठी हार्दिक पांड्याची घरवापसी झाली आहे. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने सलग दोन हंगामात अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. २०२२ मध्ये हार्दिकसेनेने पदार्पणाच्या हंगामात किताब जिंकण्याची किमया साधली.