IPL 2024 GT vs MI Live Updates In Marathi | अहमदाबाद: मुंबई इंडियन्सचा संघ प्रथमच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळत आहे. हार्दिकची मुंबईच्या संघात घरवापसी झाली असून त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना हार्दिकने स्वत: पहिले षटक टाकण्याचा निर्णय घेतला अन् टीकाकारांना आमंत्रण दिले. (Hardik Pandya) आधीच मुंबईचे चाहते संघ व्यवस्थापनावर नाराज असल्याचे दिसले. हार्दिकने जसप्रीत बुमराहऐवजी स्वत: पहिले षटक का टाकले असा प्रश्न इंग्लंडचा माजी खेळाडू केव्हिन पीटरसनने केला. (MI vs GT Match Live)
भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने देखील बुमराह कुठे आहे, अशा शब्दांत पांड्याच्या निर्णयावर नाराजी दर्शवली. खरं तर बुमराहला चौथे षटक देण्यात आले. या षटकात बुमराहच्या फास्ट लोकलने वृद्धीमान साहाचा त्रिफळा काढला.
आजच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीवेळी बोलताना हार्दिक पांड्याने आठवणी सांगितल्या. तो म्हणाला की, जिथून क्रिकेटची, आयपीएलची सुरुवात केली तिथे मी पुन्हा आलो आहे. माझे जन्म ठिकाण हे गुजरात आहे, तर माझ्या क्रिकेटचे जन्म ठिकाण मुंबई आहे. आगामी काळातील आव्हानांसाठी मी उत्सुक आहे. इथे येऊन खूप छान वाटले.
मुंबईचा संघ -हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, नमन धीर, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, शम्स मुलाणी, गेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड.
गुजरातचा संघ -शुबमन गिल (कर्णधार), वृद्धीमान साहा, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अजमतुल्लाह उमरजई, राशिद खान, उमेश यादव, साई किशोर आणि स्पेंसर जॉन्सन.
दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएची ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामासाठी हार्दिक पांड्याची घरवापसी झाली आहे. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने सलग दोन हंगामात अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. २०२२ मध्ये हार्दिकसेनेने पदार्पणाच्या हंगामात किताब जिंकण्याची किमया साधली.