Join us  

IPL 2024 KKR vs SRH: क्लासेनचा 'क्लास'! KKR चा संघ 'गंभीर', स्टार्कची धुलाई, पण अखेर सु'यश'

IPL 2024 KKR vs SRH Live Score Card: सनरायझर्स हैदराबादला नमवून केकेआरच्या संघाने विजयी सलामी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 11:27 PM

Open in App

IPL 2024 KKR vs SRH Live Updats In Marathi । कोलकाता: आपल्या घरच्या मैदानावर सलामीचा सामना खेळून कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने विजयी सलामी दिली. (KKR vs SRH) नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारण्यात यजमान संघाला यश आले. आंद्रे रसेलच्या स्फोटक खेळीच्या जोरावर केकेआरने हैदराबादला २०९ धावांचे तगडे लक्ष्य दिले होते. (IPL 2024 News) धावांचा बचाव करताना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात केकेआरने बाजी मारली. सामना केकेआरच्या बाजूने झुकला असताना हेनरिक क्लासेनने (Henric Classen) स्फोटक खेळी करून रंगत आणली. त्याने २९ चेंडूत ८ षटकारांच्या मदतीने ६३ धावांची स्फोटक खेळी केली.  हेनरिक क्लासेनने १९ व्या षटकात ३ षटकार ठोकून हैदराबादच्या चाहत्यांना जागे केले. खरं तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरलेल्या मिचेल स्टार्कची चांगलीच धुलाई झाली. स्टार्कच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर शाहबाज अहमदने देखील षटकार ठोकला अन् केकेआरच्या ताफ्यात खळबळ माजली. हैदराबादला विजयासाठी शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती. हर्षित राणाच्या पहिल्याच चेंडूवर क्लासेनने षटकार लगावला. मग ५ चेंडूत ७ धावांची गरज होती. दुसऱ्या चेंडूवर एक धाव काढली. तिसऱ्या चेंडूवर शाहबाज अहमद बाद झाला. चौथ्या चेंडूवर एक धाव काढल्याने क्लासेनला स्ट्राईक मिळाली. पाचव्या चेंडूवर सुयश शर्माने अप्रतिम झेल घेऊन क्लासेनला बाहेरचा रस्ता दाखवला. अखेरच्या चेंडूवर हैदराबादला ५ धावांची गरज होती. पण शेवटचा चेंडू निर्धाव गेला अन् केकेआरने ४ धावांनी विजय मिळवला. 

दरम्यान, केकेआरकडून सर्वच गोलंदाजांची धुलाई झाली. पण हर्षित राणाने मोक्याच्या क्षणी संघाला बळी मिळवून दिले. त्याने अखेरचे षटक अप्रतिम टाकले अन् हैदराबादच्या तोंडचा घास पळवला. त्याला ३ षटकांत ३३ धावा देऊन सर्वाधिक ३ बळी घेता आले. तर मिचेल स्टार्कने ४ षटकांत ५३ धावा दिल्या पण त्याच्या हाती निराशा लागली. याशिवाय वरूण चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांना १-१ बळी घेता आला. फलंदाजीत कमाल करणाऱ्या रसेलने दोन बळी घेऊन संघाच्या विजयात योगदान दिले. 

पंजाब किंग्जकडून क्लासेनने सर्वाधिक (६३) धावा केल्या, तर मयंक अग्रवाल (३२), अभिषेक शर्मा (३२), राहुल त्रिपाठी (२०), एडन मार्करम (१८), अब्दुल समद (१५), शाहबाज अहमद (१६) आणि मार्को जान्सेन १ धाव करून नाबाद परतला. 

रसेलची वादळी खेळी प्रथम फलंदाजी करताना केकेआरकडून सुरुवातीला फिल साल्ट (५४) आणि रमनदीप सिंग यांनी शानदार खेळी केली. त्यानंतर आंद्रे रसेलच्या वादळाने हैदराबादच्या गोलंदाजांना धू धू धुतले. केकेआरकडून फिल साल्टने (५४) धावा केल्या, तर सुनील नरेन (२), व्यंकटेश अय्यर (७), श्रेयस अय्यर (०), नितीश राणा (९), रमनदीप सिंग (३५), रिंकू सिंग (२३) आणि आंद्रे रसेलने नाबाद ६४ धावा केल्या. केकेआरने निर्धारित २० षटकांत ७ बाद २०८ धावा केल्या होत्या. रसेलने ७ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने २५ चेंडूत ६४ धावा कुटल्या. त्याने केवळ २० चेंडूत सहा षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या वादळी खेळीसमोर हैदराबादच्या कोणत्याच गोलंदाजाचा टिकाव लागला नाही. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक धावा दिल्या. त्याला एकही बळी घेता आला नाही. भुवीने त्याच्या निर्धारित ४ षटकांत ५१ धावा दिल्या, तर मार्को जान्सेन (४०), पॅट कमिन्स (३२), मयंक मार्कंडेय (३९) आणि नटराजनने (३२) धावा दिल्या. 

KKR चा संघ -श्रेयस अय्यर (कर्णधार), फिल साल्ट (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, रमनदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरूण चक्रवर्ती. 

SRH चा संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जान्सेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय आणि टी नटराजन, 

टॅग्स :कोलकाता नाईट रायडर्ससनरायझर्स हैदराबादआयपीएल २०२४