IPL 2024 RCB vs KKR Live Updates In Marathi | बंगळुरू: कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या सतराव्या हंगामातील दहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. केकेआरने या विजयासह यजमानांचा दबदबा मोडित काढला. (KKR Won Against RCB) खरं तर आतापर्यंतच्या ९ सामन्यांमध्ये यजमान संघांनी विजय मिळवला. पण, केकेआरने आरसीबीच्या घरात जाऊन त्यांना पराभवाची धूळ चारली. तसेच २०१६ पासून आरसीबीला एकदाही आपल्या घरात कोलकाताचा पराभव करता आला नसून ही परंपरा कायम राहिली आहे. (IPL 2024 News) आरसीबीने दिलेल्या आव्हानाचा सहज पाठलाग करत केकेआरने ७ गडी आणि १९ चेंडू राखून विजय मिळवला.
आरसीबीने दिलेल्या १८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरच्या फलंदाजांना सांघिक कामगिरी केली. पाहुण्या संघाकडून फिल साल्ट (३०), सुनील नरेन (४७), व्यंकटेश अय्यर (५०) आणि कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद (३९) धावा केल्या. आरसीबीकडून विराट कोहलीने मोठी खेळी केली. पण किंग कोहलीच्या संथ खेळीचा टिकाव लागला नाही. केकेआरच्या फलंदाजांनी सुरुवातीपासून विराट खेळी करून विजयाच्या दिशेने कूच केली. केकेआरकडून सुनील नरेनने ५ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २२ चेंडूत ४७ धावा कुटल्या, तर व्यंकटेश अय्यरने ३० चेंडूत ५० धावा केल्या. सलग ९ वर्ष आरसीबीला आपल्या घरच्या मैदानावर केकेआरकडून पराभूत व्हावे लागले. बंगळुरूकडून यश दयाल, मयंक डागर आणि वैशाख विजय कुमार यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
तत्पुर्वी, आरसीबीने निर्धारित २० षटकांत ६ बाद १८२ धावा करून केकेआरला विजयासाठी १८३ धावांचे आव्हान दिले. किंग कोहलीने ८३ धावांची नाबाद खेळी केली. आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ५९ चेंडूत ४ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ८३ धावा केल्या. तर, फाफ डुप्लेसिस (६), कॅमेरून ग्रीन (३३), ग्लेन मॅक्सवेल (२८), रजत पाटीदार (३), अनुज रावत (३) आणि दिनेश कार्तिकने नाबाद २० धावा केल्या. केकेआरकडून आंद्रे रसेल वगळता सर्वच गोलंदाजांची धुलाई झाली. रसेल आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले, तर सुनील नरेनला १ बळी घेण्यात यश आले. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरलेल्या मिचेल स्टार्कची आज देखील बेक्कार धुलाई झाली. स्टार्कला आज देखील एकही बळी घेता आला नाही आणि त्याने ४ षटकांत ४७ धावा दिल्या.
यजमान आरसीबीकडून विराटने सर्वाधिक ८३ धावा केल्या, पण केकेआरच्या खेळीच्या तुलनेत विराटने संथ गतीने धावा केल्या. त्याने पहिल्या २० चेंडूत ४० तर अखेरच्या ३९ चेंडूत ४३ धावा कुटल्या. किंग कोहलीने १४०.६८ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या पण आरसीबी विजयापासून दूरच राहिली.
KKR चा संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), फिल साल्ट (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, रमनदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरूण चक्रवर्ती, अनुकूल राय.
RCB चा संघ -
फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अनुज रावत, यश दयाल, अल्झारी जोसेफ, मयंत डागर आणि मोहम्मद सिराज.