IPL 2024 RR vs DC Live Match Updates In Marathi | जयपूर: राजस्थान रॉयल्सनेदिल्ली कॅपिटल्सला नमवून यंदाच्या हंगामातील परंपरा कायम ठेवली आहे. (RR vs DC News) आयपीएलच्या सतराव्या हंगामातील नवव्या सामन्यात देखील यजमानांचा दबदबा पाहायला मिळाला. आज दिल्ली कॅपिटल्सला नमवून राजस्थानने सलग दुसरा विजय नोंदवला. रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्लीचा १२ धावांनी पराभव झाला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात यजमान राजस्थानने बाजी मारली. आवेश खानने शेवटचे षटक अप्रतिम टाकून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. (IPL 2024 News)
खरं तर दिल्लीला अखेरच्या १२ चेंडूत ३२ धावांची गरज होती. यजमान संघाकडून एकोणिसावे षटक संदीप शर्मा टाकत होता. या षटकातील पहिल्याच चेंडूवर स्टब्सने षटकार खेचला. त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवर चौकार आला. आता १० चेंडूत २२ धावांची गरज होती. पुढच्या चेंडूवर १ धाव आल्याने अक्षर पटेलला फलंदाजीची संधी मिळाली. एकोणिसाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर देखील १ धाव मिळाली. ८ चेंडूत २० धावा हव्या असताना १ धाव काढून स्टब्सने पुन्हा अक्षरला स्ट्राईक दिले. अखेरच्या चेंडूवर २ धावा काढल्याने दिल्लीला शेवटच्या षटकात विजयासाठी १७ धावांची गरज होती.
अखेरच्या षटकात दिल्लीला १७ धावा हव्या असताना आवेश खानने पहिल्या चेंडूवर केवळ १ धाव दिली. आता अक्षर पटेल स्ट्राईकवर होता. दुसरा चेंडू निर्धाव गेला अन् दिल्लीची पराभवाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. तिसऱ्या चेंडूवर अक्षरला १ धाव काढता आली. ३ चेंडूत १५ धावांची गरज होती पण आवेशने आणखी १ चांगला चेंडू टाकून १ धाव दिली. आता केवळ औपचारिकता शिल्लक होती. कारण दिल्लीला २ चेंडूत १४ धावांची आवश्यकता होती. पाचवा चेंडू निर्धाव गेला आणि शेवटच्या चेंडूवर १ धाव काढली अन् दिल्लीने १२ धावांनी सामना गमावला.
दिल्ली कॅपिटल्सकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक (४९) धावा करून झुंज दिली पण त्यालाही अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकता आले नाही. तर, मिचेल मार्श (२३), रिकी भुई (०), रिषभ पंत (२८), ट्रिस्टन स्टब्स (नाबाद ४४ धावा), अभिषेक पोरेल (९) आणि अक्षर पटेलने नाबाद (१५) धावा केल्या. राजस्थानकडून नंद्रे बर्गर आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले, तर आवेश खानला १ बळी घेण्यात यश आले. आवेशने अखेरच्या षटकात केवळ ४ धावा देऊन कमाल केली.
तत्पुर्वी, राजस्थानकडून मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या रियान परागने मैदान गाजवले. त्याने अर्धशतकी खेळी करून घरच्या चाहत्यांना जागे केले. त्याला आर अश्विन आणि ध्रुव जुरेल यांनी साथ देण्याचा प्रयत्न केला. राजस्थानने निर्धारित २० षटकांत ५ बाद १८५ धावा केल्या होत्या. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ६ बाद १८५ धावा केल्या. यजमान संघाकडून रियान परागने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ४५ चेंडूत ६ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने नाबाद ८४ धावा कुटल्या. तर, यशस्वी जैस्वाल (५), जोस बटलर (११), संजू सॅमसन (१५), आर अश्विन (२९), ध्रुव जुरेल (२०) आणि शिमरोम हेटमायरने नाबाद १४ धावा केल्या. दिल्लीकडून प्रत्येक गोलंदाजाला १-१ बळी घेण्यात यश आले. खलील अहमद, मुकेश कुमार, एनरिक नॉर्तजे, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी सांघिक खेळी केली. रियान परागने एनरिक नॉर्तजेची चांगलीच धुलाई केली. दिल्लीकडून अखेरचे षटक घेऊन आलेल्या नॉर्तजेच्या या षटकात परागने २५ धावा खेचल्या. त्याने ४,४,६,४,६ आणि अखेरच्या चेंडूवर १ धाव काढली.
दिल्लीचा संघ -रिषभ पंत (कर्णधार, यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, मुकेश कुमार, खलील अहमद आणि एनरिक नॉर्तजे.
राजस्थानचा संघ - संजू सॅमसन (कर्णधार, यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, शिमरोन हेटमायर, रियान पराग, ध्रुव जुरेल, आर अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा.