IPL 2024 SRH vs MI Live Updates In Marathi | हैदराबाद: सनरायझर्स हैदराबादने धावांचा डोंगर उभारल्यानंतर मुंबई इंडियन्सने खूप संघर्ष केला. सलामीवीर इशान किशन आणि त्यानंतर तिलक वर्मा यांनी अप्रतिम खेळी करून सामन्यात रंगत आणली. पण तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला अपयश आले. हैदराबादने दिलेल्या २७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला घाम फुटला. मुंबईचा संघ निर्धारित २० षटकांत ५ बाद २४६ धावा करू शकला आणि सामना ३१ धावांनी गमावला. (IPL 2024 News)
मुंबईला विजयासाठी अखेरच्या १२ चेंडूत ५४ धावांची गरज होती. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स एकोणिसावे षटक घेऊन आला. या षटकातील पहिल्या चेंडूवर १ आणि दुसऱ्या चेंडूवर मुंबईला २ धावा मिळाल्या. तिसऱ्या चेंडूवर देखील २ धावा काढण्यात पाहुण्या संघाला यश आले. आता ९ चेंडूत ५० धावांची गरज होती. पण, कमिन्सने अप्रतिम गोलंदाजी करत आपल्या संघाला विजयाच्या जवळ नेले.
अखेरच्या षटकात मुंबई इंडियन्सला ४७ धावांची आवश्यकता होती. आता केवळ औपचारिकता राहिली होती. पण, टीम डेव्हिडने मयंक मार्कंडेयच्या पहिल्या चेंडूवर १ धाव काढली. दुसऱ्या चेंडूवर शेफर्डने षटकार ठोकल्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव गेला. चौथा चेंडू ४ धावा देऊन गेला. शेवटचा चेंडू निर्धाव गेला अन् मुंबईने ३१ धावांनी सामना गमावला.
२७८ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी चांगला संघर्ष केला. रोहित शर्मा (२६), इशान किशन (३४), नमन धीर (३०), तिलक वर्मा (६४), हार्दिक पांड्या (२४), टीम डेव्हिड (नाबाद ४२ धावा) आणि रोमिरियो शेफर्डने नाबाद १५ धावा केल्या. यजमान संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने गोलंदाजीत कमाल केली. इतर सर्व गोलंदाजांची धुलाई होत असताना कमिन्सने ४ षटकांत ३५ धावा देत २ बळी घेतले.
तत्पुर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने धावांचा डोंगर उभारला. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन आणि एडन मार्करम यांनी हार्दिकसेनेची चांगलीच धुलाई केली. विशेष बाब म्हणजे आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या करून हैदराबादच्या संघाने इतिहास रचला. मुंबईसमोर विजयासाठी तब्बल २७८ धावांचे आव्हान होते. यजमान हैदराबादने निर्धारित २० षटकांत ३ बाद २७७ धावा केल्या होत्या.
SRH ची ऐतिहासिक खेळी
मंयक अग्रवाल (११) स्वस्तात बाद झाल्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी मोर्चा सांभाळला. त्यांनी स्फोटक खेळी करत मुंबईच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी केली. हेडने ३ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने २४ चेंडूत ६२ धावा केल्या. तर अभिषेक शर्माने ७ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने २३ चेंडूत ६३ धावा कुटल्या. एडन मार्करम आणि हेनरिक क्लासेन यांनी देखील हात साफ केले. एडन मार्करमने १ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २८ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या, तर हेनरिक क्लासेनने ७ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ३४ चेंडूत ८० धावा कुटल्या आणि ऐतिहासिक धावसंख्या उभारली. हैदराबादने २० षटकांत ३ बाद २७७ धावा केल्या.
मुंबईकडून सर्वच गोलंदाजांची धुलाई झाली. क्वेना मफाकाने ४ षटकांत तब्बल ६६ धावा दिल्या. कर्णधार हार्दिक पांड्याने ४ षटकांत ४६ धावा देत १ बळी घेतला. तर जसप्रीत बुमराहने पहिले दोन षटक चांगले टाकले आणि ४ षटकांत ३६ धावा दिल्या मात्र त्यालाही बळी घेता आला नाही. गेराल्ड कोएत्झीने ४ षटकांत ५८ धावा देऊन १ बळी घेतला, तर पियुष चावलाच्या २ षटकांत यजमानांनी ३४ धावा खेचल्या. शम्स मुलाणीच्या २ षटकांत हैदराबादने ३३ धावा काढल्या.
हैदराबादचा संघ -
पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय आणि जयदेव उनाडकट.
मुंबईचा संघ -
हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नमन धीर, गेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, शम्स मुलाणी, क्वेना महाका.
Web Title: Ipl Match 2024 live score SRH vs MI Sunrisers Hyderabad beat Mumbai Indians by 31 runs to open their account of victory
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.