नवी दिल्ली : ‘आयपीएलच्या दोन नव्या संघांच्या विक्रीबाबत मोठी उत्सुकता आहे. सावधगिरी म्हणून या दोन्ही संघांचे आधारमूल्य दोन हजार कोटी रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. मात्र, लिलावादरम्यान यामध्ये ५० ते १०० टक्के वाढ होईल,’ अशी शक्यता पंजाब किंग्जचे सहमालक नेस वाडिया यांनी व्यक्त केली. आयपीएलमधील दोन नव्या संघांची घोषणा २५ ऑक्टोबरला होणार असून, याद्वारे आयपीएल स्पर्धा १० संघांची होईल.
दोन नवे संघ जुळल्यानंतर इतर फ्रेंचाइजींच्या किमतीमध्येही वाढ होईल, अशी शक्यताही वाडिया यांनी वर्तवली. वाडिया यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘नव्या संघांची सध्याची किंमत दोन हजार कोटी इतकी आहे. परंतु, यामध्ये लिलावादरम्यान खूप मोठी वाढ होईल. आयपीएलमधील आतापर्यंतच्या अनुभवावरून आणि माहितीनुसार सांगायचे झाल्यास, दोन हजार कोटी रक्कम सावधगिरी म्हणून ठेवण्यात आली आहे. जर यामध्ये ५० ते १०० टक्के वाढ झाली तर मला आश्चर्य नाही वाटणार. मला किमान तीन हजार कोटींहून अधिक रकमेची आशा आहे.’
वाडिया पुढे म्हणाले की, ‘सर्वांनाच आयपीएलचा एक भाग बनायचे असते; पण काहींनाच यामध्ये यश मिळवता येते. दोन नव्या संघांमुळे सध्याच्या कोणत्याही संघांना त्याची चिंता नाही. दोन नव्या संघांचा समावेश होणार, ही चांगलीच बाब आहे. यामुळे स्पर्धेतील सर्व संघांच्या किमतींमध्ये वाढ होईल. १० संघांच्या समावेशामुळे स्पर्धेचा विस्तार व्यापक होईल. आयपीएल बीसीसीआयच्या मुकुटावरील रत्न आहे आणि त्यामुळे या रत्नाची योग्य किंमत असली पाहिजे.’