आयपीएलचे सामने प्रेक्षकांविना रंगण्याची शक्यता; केंद्राने राज्य शासनाला पाठवले सावधानतेचे पत्र

आयपीएलच्या यंदाच्या १५व्या सत्राला सुरुवात होण्यासाठी केवळ काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 07:29 AM2022-03-21T07:29:33+5:302022-03-21T07:30:21+5:30

whatsapp join usJoin us
ipl matches likely to be played without spectators center sends warning letter to state government | आयपीएलचे सामने प्रेक्षकांविना रंगण्याची शक्यता; केंद्राने राज्य शासनाला पाठवले सावधानतेचे पत्र

आयपीएलचे सामने प्रेक्षकांविना रंगण्याची शक्यता; केंद्राने राज्य शासनाला पाठवले सावधानतेचे पत्र

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आयपीएलच्या यंदाच्या १५व्या सत्राला सुरुवात होण्यासाठी केवळ काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. २६ मार्चपासून वानखेडे स्टेडियमवर गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने यंदाच्या आयपीएलचे बिगूल वाजतील. मात्र, सध्या पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याने एक संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला सावधानतेचा इशारा देणारे पत्र पाठवून काळजी घेण्याचे सुचविले आहे. त्यामुळे आयपीएल पुन्हा एकदा प्रेक्षकांविना रंगण्याची चर्चा रंगू लागली आहे.

यंदाच्या आयपीएल सामन्यांसाठी महाराष्ट्र सरकारने २५ टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याची परवानगी बीसीसीआयला दिली आहे. मात्र, दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढला  आहे. भारतात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता. त्यातच यंदा आयपीएलचे ५५ साखळी सामने मुंबईत, तर १५ साखळी सामने पुण्यात खेळविण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडून पत्र मिळाल्याचे माहिती दिली. 

युरोपियन देश, द. कोरिया आणि चीन येथे पुन्हा एकदा कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. याकडे लक्ष वेधताना आरोग्य विभागाने सावध राहून आवश्यक उपाययोजना करण्यास सांगितले आहे. त्याचवेळी, आयपीएल सामन्यांच्या आयोजनाबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही, असेही टोपे यांनी सांगितले.

अनुभवी खेळाडूंनी युवकांना मार्गदर्शन करावे – पॉन्टिग

इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावात संघात अनेक युवा खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे.  आता संघात कायम ठेवण्यात आलेल्या खेळाडूंची ही जबाबदारी आहे की त्यांनी युवा खेळाडूंना मार्गदर्शन करावे, असे मत दिल्ली ड़ेअरडेविल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी व्यक्त केले आहे.  पॉन्टिंग यांनी म्हटले की, मी खेळाडूंना सांगितले आहे की, युवा खेळाडूंसोबत अधिक वेळ घालवावा.  दिल्लीच्या संघात असे काही खेळाडू आहेत. त्यांनी निश्चितपणे या युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले पाहिजे.  त्यांनी म्हटले की,‘ऋषभ संघाचा कर्णधार आहे आणि सोबतच पृथ्वी शॉ, अक्षर आणि नॉर्खियासारखे खेळाडूदेखील  त्यांची भूमिका आणि जबाबदारी सांभाळतील.’

ऋतुराज गायकवाड तंदुरुस्त

चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड हा मनगटाच्या दुखापतीतून तंदुरुस्त झाला आहे. त्याने संघासोबत सरावाला सुरुवात केली असून तो निवडीसाठी उपलब्ध आहे. आता त्याच्यासोबत सलामीला पर्याय म्हणून सीएसकेच्या संघ व्यवस्थापनाने डिवोन कॉन्वॅयची चाचपणी सुरू केली आहे. तो सीएसकेसाठी सलामीचा पर्याय ठरू शकतो. असे असले तरी दीपक चहर आणि अंबाती रायुडू यांच्या उपलब्धतेबाबत अजूनही साशंकता आहे.

मोइन अलीला व्हिसाची प्रतीक्षा 

इंग्लंड आणि चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार अष्टपैलू मोइन अली याला अद्याप भारतीय व्हिसा मिळालेला नाही. त्यामुळे सीएसके संघाच्या चिंतेत भर पडली आहे. आधीच वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड तंदुरुस्त नसल्याने सीएसकेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. मोइनला सीएसकेने ८ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. गेल्या वर्षी सीएसकेच्या विजेतेपदामध्ये मोइनने दमदार अष्टपैलू खेळ करत निर्णायक भूमिका निभावली होती. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, ‘मोइनने म्हटले की, कागदपत्र मिळाल्यानंतर पुढील विमानाने तो भारतात येईल. बीसीसीआय याप्रकरणी हस्तक्षेप करत आहे.’ मोईनने २८ फेब्रुवारीला व्हिसासाठी अर्ज केला होता, अशी माहितीही मिळाली आहे.
 

Web Title: ipl matches likely to be played without spectators center sends warning letter to state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.