IPL Media Rights: IPLमध्ये पैशांचा पाऊस पडतो हे सर्वांनाच माहीत आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) या स्पर्धेतून अधिक कमाई करण्याचा विचार करत आहे. BCCIने अलीकडेच आयपीएल मीडिया हक्कांसाठी निविदा जारी केली. ही निविदा २०२३ ते २०२७ साठी आहे. BCCIने या निविदेसाठी एकूण ३३ हजार कोटी रुपये (३२,८९०) मूळ किंमत ठेवली आहे. सध्या ही निविदा ७४ सामन्यांनुसार ठरविण्यात आली आहे. त्यात दहा संघ सहभागी होणार आहेत. मात्र, BCCI या सामन्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय स्वत:कडे राखून ठेवला आहे.
BCCI च्या OTT च्या प्रेक्षकांसाठी नवा 'प्लॅन'
BCCIच्या नव्या प्रस्तावात, प्रक्षेपणाची डिजिटल किंमत प्रति सामन्यासाठी ३३ कोटी रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. पण BCCIच्या एका विभागात १८ सामन्यांसाठी एक स्वतंत्र प्रसारण विंडो देण्यात आली आहे. ही विंडो प्रत्येक सामन्यासाठी १६ कोटी रुपयांची असेल. यामध्ये स्पर्धेचे उद्घाटन सामने, डबल हेडर सामने आणि प्ले-ऑफ सामन्यांचा समावेश आहे. हे सामने फक्त OTT वर प्रसारित केले जातील असा नवा प्लॅन आहे.
विशेष म्हणजे, यावेळी BCCI वेगवेगळ्या विभागानुसार मीडिया अधिकाराचा प्रस्ताव मांडला आहे. त्यात भारतीय उपखंडासाठी स्वतंत्र प्रसारण करार असेल. क्रिकबझच्या माहितीनुसार, नव्या प्रस्तावातून बीसीसीआयला फक्त भारतीय उपखंडात प्रसारणासाठी प्रति सामन्यासाठी ४९ कोटी रुपये मिळू शकतील. निविदेतील एक विभाग हा जागतिक प्रसारणासाठी आहे. त्याची किंमत प्रति सामन्यासाठी ३ कोटी रुपये असेल. सर्व विभाग एकत्र केल्यास, बीसीसीआयची एकूण मूळ किंमत ३२ हजार ८९० कोटी इतकी जाते.