नवी दिल्ली :
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) प्रसारण हक्कांसाठी पॅकेज ए आणि पॅकेज बीमध्ये ४४ हजार ७५ कोटी रुपयांची बोली लागली आहे. त्यात टीव्ही प्रसारण हक्कांसाठी डिस्नी (स्टार स्पोर्ट्स)ने २३ हजार ५७५ कोटी आणि व्हायकॉम १८ (रिलायन्स)ने डिजिटल हक्कांसाठी २०,५०० कोटी रुपयांची बोली लावली आहे. बीसीसीआयला पुढील पाच वर्षांत होणाऱ्या ४१० सामन्यांमध्ये प्रत्येक सामन्याला १०७.५ कोटी रुपये मिळतील. यात आज, मंगळवारी अजून पॅकेज सी आणि पॅकेज डीचे लिलाव होणार आहेत.
पॅकेज सीमध्ये दोन हजार कोटींची बोलीपॅकेज ए आणि पॅकेज बीचे लिलाव पूर्ण झालेले असले तरी पॅकेज सी आणि डीचे लिलाव मंगळवारी पूर्ण होतील. त्यात पॅकेज सीमध्ये आणखी दोन हजार कोटींची बोली लागली असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे एकूण रकमेचा आकडा ४६ हजार कोटींवर गेला आहे. पॅकेज सी मध्ये भारतीय उपखंडात निवडक डिजिटल हक्कांचा समावेश करण्यात आला आहे.
दुसरी सर्वांत महागडी लीगआयपीएल ही प्रसारण हक्कांमधून पैसे कमावण्याच्या शर्यतीत आयपीएल ही दुसरी महागडी लीग ठरली आहे. त्यात आयपीएलला एका सामन्यासाठी १०७.५ कोटी रुपये मिळणार आहेत.
फक्त टीव्हीवर दाखविल्या जाणाऱ्या सामन्यांचा विचार केला तर या लिलावातून बीसीसीआयला एका सामन्यासाठी ५७.५ कोटी रुपये मिळतील, तर डिजिटल हक्कांमधून एका सामन्यासाठी ५० कोटी रुपये मिळणार आहेत. एकूण १०७.५ कोटी रुपये मिळतील. २०१८ मध्ये बीसीसीआयला या हक्कांमधून १६,३४७ कोटी रुपये मिळाले होते.बीसीसीआच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सायंकाळी सहा वाजता बोली लावण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली. आता पॅकेज सी मधील ९८ सामन्यांसाठी मंगळवारी प्रक्रिया पुढे नेली जाईल. हे ९८ सामने पाच वर्षांत होणार असून, त्यातील १८ सामने पहिल्या दोन सत्रात होतील, तर पॅकेज डी हे भारतीय उपखंडाबाहेर टीव्ही आणि डिजिटल हक्कांसाठी आहे.’ यात २०२३ आणि २०२४ मध्ये प्रत्येकी ७४ सामने, २०२५ आणि २०२६ मध्ये प्रत्येकी ८४ सामने आणि २०२७ मध्ये ९४ सामने होणार आहेत.
एकाच नेटवर्कवर सामने नाही- पॅकेज ए आणि पॅकेज बीची घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी त्याची अधिकृत पुष्टीदेखील होईल की प्रसारण हक्क कोणत्या कंपनीला मिळाले. मात्र, टीव्ही आणि डिजिटल हक्क दोन्ही वेगवेगळ्या कंपन्यांनी घेतले आहेत. त्यामुळे एकाच नेटवर्कवर टीव्ही आणि डिजिटल प्रारूपातील सामने बघायला मिळणार नाही, हे मात्र स्पष्ट आहे.
अव्वल पाच लीग (प्रती सामने)एनएफएल- १३३ कोटीआयपीएल- १०७.५ कोटीएमएलबी- ८६ कोटीइपीएल- ८६ कोटीएनबी- १५.६ कोटी