IPL Mega Auction 2022 मध्ये २०४ खेळाडूंवर बोली लावण्यात आली. भारतीय युवा व अनुभवी खेळाडूंसोबतच अनेक परदेशी खेळाडूंनाही संघांनी मोठ्या बोली लावून विकत घेतले. या स्पर्धेत काही खेळाडू असेही होते, ज्यांच्यावर बोलीच लागली नाही. अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंपैकी एका खेळाडूने मेगा लिलाव संपल्यानंतर आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन आणि फिरकीपटू अँडम झॅम्पा या दोघांवरही बोली लावण्यात आली नाही. हे दोघेही गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळले. पण यंदा इतर संघांसह RCBनेही या दोघांना विकत घेण्यात रस दाखवला नाही. यामागे नक्की काय कारण आहे, याबद्दल केन रिचर्डसनने मत मांडलं.
"माझ्यावर बोली लागली नाही, त्यापेक्षाही जास्त धक्का मला झँम्पा अनसोल्ड राहिल्याचा लागला. गेल्या वर्षी आम्ही स्पर्धेच्या मध्यातच संघ सोडून ऑस्ट्रेलियाला परतलो होतो. त्यावेळीच मी झॅम्पाला म्हटलं होतं की आता आपण जे करत आहोत त्याची आपल्याला कदाचित किंमत मोजावी लागेल. त्यावेळी ऑस्ट्रेलियाला जाणं आणि देशासाठी खेळणं हे आमचं आद्यकर्तव्य होतं. त्यामुळे कदाचित काही संघमालकांना असं वाटलं असेल की यंदाही आम्ही स्पर्धेच्या मध्यातूनच असे निघून जाऊ, म्हणून आमच्या बोली लावण्यात संघांनी रस दाखवला नाही", असं केन रिचर्डसनने स्पष्टपणे सांगितलं.
यंदाच्या वर्षी सुरेश रैना, अमित मिश्रा, इशांत शर्मा, पियुष चावला, केदार जाधव यांसारख्या अनेक भारतीय अनुभवी खेळाडूंवर बोली लावली गेली नाही. तसेच, स्टीव्ह स्मिथ, शाकीब अल हसन, आरोन फिंच, इयॉन मॉर्गन यांसारख्या विदेशी खेळाडूंना संघात घेण्यातही कोणी रस दाखवला नाही.