मुंबई - इंडियन प्रिमियर लीग २०२२ साठीचे मेगाऑक्शन नुकतेच बंगळुरूमध्ये पार पडले. या लिलावामध्ये ईशान किशन, दीपक चहर, लियम लिव्हिंगस्टोन सारख्या युवा खेळाडूंवर लिलावामध्ये कोट्यवधीची बोली लागली. मात्र सुरेश रैना, स्टिव्ह स्मिथ, ईशांत शर्मासारख्या खेळाडूंवर बोली लागली नाही. दरम्यान, या मेगाऑक्शनमध्ये एक अशी घटना घडली ज्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
आयपीएलच्या मेगाऑक्शनदरम्यान, ऐनवेळी सूत्रसंचालन सांभाळत लिलावप्रक्रिया पार पाडणाऱ्या चारू शर्मा यांची खूप चर्चा झाली. त्यांनी लिलावादरम्यान, प्रकृती बिघडलेले ऑक्शनर ह्युज एडमीड्स यांच्या जागी लिलाव प्रक्रियेचे संचालन केले. चारू शर्मा यांनी एडमिड्स यांची उणीव भासू दिली नाही. मात्र लिलावाच्या दुसऱ्या दिवशी चारू शर्मांकडून एक चूक झाली. वेगवान गोलंदाज खलील अहमद याला आपल्या संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चढाओढ सुरू असताना ही घटना घडली.
खलील अहमदला दिल्ली कॅपिटल्सने ५.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. मात्र आयपीएलच्या मेगा ऑक्शननंतर एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये खलील अहमद हा दिल्लीऐवजी मुंबईला त्याच किमतीत मिळाला पाहिजे होता. या व्हिडीओमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक किरणकुमार ग्रांथी हे ५ कोटी रुपयांची बोली लावताना दिसत आहेत.
त्यानंतर मुंबई इंडियन्सने ५.२५ कोटी रुपयांची बोली लावली होती. त्याचवेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि गडबड झाली. ग्रांथी यांनी दिल्लीकडून ५.५ कोटी रुपयांची बोली लावण्यासाठी पॅडल उचलले. मात्र त्यांनी बोलीतून माघार घेण्यासाठी पॅडल खाली ठेवले.
दिल्ली कॅपिटल्सकडून ५.५ कोटी रुपयांची बोली मागे घेण्यात आल्याची बाब चारू शर्मा यांच्या लक्षात आली नाही. ते विसरले की, मुंबई इंडियन्सने ५.२५ कोटी रुपयांची निर्णायक बोली लावली. मात्र त्यांनी दिल्ली कॅपिटल्सचा उल्लेख सर्वाधिक बोली लावणारा संघ म्हणून उल्लेख केला. तसेच मुंबई इंडियन्स ५.५ कोटी रुपयांची लावणार का अशी विचारणा केली. त्यावर मुंबईने बोली लावली नाही. मग चारू शर्मा यांनी खलील अहमदला दिल्ली कॅपिटल्सला ५.२५ कोटी रुपयांना दिले.