नवी दिल्ली : बीसीसीआय इंडियन प्रीमियर लीग २०२२चे ‘मेगा ऑक्शन’ बंगळुरु येथे ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी करणार आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. आयपीएलमधील अनेक संघ तीन वर्षांनी होणारा लिलाव टाळण्यास इच्छूक असल्याने शक्यतो हा अखेरचा लिलाव असू शकेल.
बोर्डाचा एक अधिकारी म्हणाला, ‘कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर न गेल्यास आयपीएल लिलाव भारतात होईल. बंगळुरु येथे तयारी सुरू झाली आहे.’ हा लिलाव यूएईत होईल, असे वृत्त होते. मात्र, बीसीसीआयची अशी योजना नाही. त्यामुळे सध्या बंगळुरु येथे लिलाव प्रक्रियेच्या आयोजनाने जोर धरला आहे.
ओमायक्रानमुळे प्रवासावर निर्बंध आल्याने लिलावाचे आयोजन भारतात करणे सोपे असेल. लखनौ व अहमदाबाद या संघांमुळे यंदा दहा संघांसाठी लिलाव प्रक्रिया होईल. दोन्ही संघांना ड्रॉफ्टमधून प्रत्येकी तीन खेळाडू निवडण्यास २५ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. सीव्हीसी अहमदाबाद संघावर अद्याप अंतिम निर्णय न झाल्याने बीसीसीआय या दोन संघांना अतिरिक्त वेळ देऊ शकेल.
यंदाची लिलाव प्रक्रिया आयपीएलमधील अखेरची लिलाव प्रक्रिया ठरेल, असेही मानले जात आहे. अनेक फ्रेंचाईजींनी दर तीन वर्षांनी होत असलेल्या लिलावामुळे संघाची नव्याने घडी बसवावी लागत असल्याची तक्रार केली आहे. दिल्ली कॅपिटल्स सहमालक पार्थ जिंदल यांनीही याबाबत आपली नाराजी व्यक्त केली.
अनेक फ्रेंचाईजींचे मत आहे की, दर तीन वर्षांनी होणाऱ्या लिलावामुळे संघ संयोजन बिघडण्याची भीती असते. दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक पार्थ जिंदल यांनी म्हटले की, ‘संघ बांधणीसाठी कठोर मेहनत घेतल्यानंतर खेळाडूंना सोडणे कठीण होते.’