मुंबई - आयपीएलचा मेगा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबरला सौदी अरेबियाच्या जेद्दा शहरात होणार असून त्यासाठी १५७४ खेळाडूंनी नावनोंदणी केली. त्यात इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सचे नाव नाही, मात्र त्याचा अनुभवी सहकारी जेम्स अँडरसन याच्यासह इटलीचा वेगवान गोलंदाज थॉमस ड्रेका आणि भारतात जन्मलेला अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर यांचा समावेश आहे.
नेत्रावळकरसह ड्रेका याची आयपीएल लिलावासाठी सध्या मोठी चर्चा रंगली आहे. त्याचप्रमाणे, नामांकन करणाऱ्या अन्य स्टार खेळाडूंमध्ये ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल यांनी दोन कोटी रुपये या मूळ किमतीत स्वत:ला उपलब्ध ठेवले आहे. याशिवाय खलील अहमद, मुकेश कुमार, व्यंकटेश अय्यर, आवेश खान, दीपक चाहर, इशान किशन, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर मोहम्मद सिराज, देवदत्त पडिक्कल, कृणाल पांड्या, हर्षल पटेल, प्रसिद्ध कृष्णा, टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर आणि उमेश यादव यांचा देखील यादीत समावेश आहे.
सर्फराझ-पृथ्वी ७५ लाखांपासून करणार सुरुवातसर्फराझ खान आणि पृथ्वी शॉ यांनी प्रत्येकी ७५ लाख किमतीत स्वत:ची नोंदणी केली आहे. सर्फराझला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत एका दीडशतकाव्यतिरिक्त फारशी छाप पाडता आलेली नाही. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला पृथ्वी देशांतर्गत क्रिकेटमध्येही अडखळताना दिसत आहे. त्याचप्रमाणे, यंदा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या ४२ वर्षांच्या अँडरसनने पहिल्यांदाच आयपीएलमध्ये नोंदणी केली असून तो दहा वर्षांआधी २०१४ ला अखेरचा टी-२० सामना खेळला होता. अँडरसनची मूळ किंमत १.२५ कोटी ठेवण्यात आली आहे. टी-२० विश्वचषकात शानदार कामगिरी करीत लक्ष वेधणारा सौरभ नेत्रावळकर हा देखील भाग्य अजमावणार आहे. त्याची मूळ किंमत ३० लाख आहे.
महत्त्वाचे मुद्दे- मागच्या लिलावात अनसोल्ड राहिलेला ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नॅथन लायन याने पुन्हा दोन कोटीच्या आधार किमतीत नोंदणी केली.- मागच्या वर्षी सर्वांत महागडा (विक्रमी २४.५० कोटी) ठरलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांनी दोन कोटी रुपये मूळ किमतीत नोंदणी केली. - इटलीचा २४ वर्षांचा वेगवान गोलंदाज थॉमस ड्रेका हा केवळ चार टी-२० सामने खेळला. त्याने ऑगस्टमध्येे ग्लोबल टी-२० लीगमध्ये कॅनडात दमदार कामगिरी करीत लक्ष वेधले होते. त्याला अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत ३० लाख किमतीत स्थान देण्यात आले. - प्रत्येक संघ जास्तीत जास्त २५ खेळाडू (रिटेन खेळाडूंसह) खरेदी करू शकतो. दहा संघांनी ४६ खेळाडू रिटेन केले. एकूण २०४ खेळाडूंवर बोली लागणार असून त्यात ७० विदेशी खेळाडूंवर बोली लावावी लागणार आहे.