IPL Mini Auction 2024 Live Updates In Marathi । दुबई : आयपीएल २०२४ साठी आज दुबईत खेळाडूंचा लिलाव पार पडत आहे. लिलावाच्या रिंगणात एकूण ३३३ खेळाडू असून जास्तीत जास्त ७७ खेळाडूंना संधी मिळेल. काही परदेशी खेळाडूंवर मोठी बोली लागली. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सवर ऐतिहासिक बोली लावण्यात आली. खरं तर कमिन्सला तब्बल २०.५० कोटी रूपयांत सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीने आपल्या संघाचा भाग बनवले. कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
लिलावासाठी सर्व १० फ्रँचायझींच्या खात्यात एकूण २६२.९५ कोटी रुपये आहेत आणि या पर्समधून जास्तीत जास्त ७७ खेळाडूंवर बोली लागेल. गुजरात टायटन्सच्या फ्रँचायझीकडे सर्वाधिक ३८.१५ कोटी रुपये आहेत. तर, लखनौ सुपर जायंट्सकडे सर्वात कमी १३.१५ कोटी रुपये आहेत. आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सकडे सर्वात कमी खेळाडू आहेत. आताच्या घडीला केकेआरकडे १२ खेळाडूंसाठी जागा रिक्त आहे. त्याचवेळी चेन्नई, लखनौ, बंगळुरू आणि हैदराबादच्या संघात ६-६ खेळाडूंसाठी जागा शिल्लक आहे. लक्षणीय बाब म्हणजे ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सवर ऐतिहासिक बोली लागली. त्याला २०.५० कोटी रूपयांत सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीने आपल्या संघाचा भाग बनवले.
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला खरेदी करण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात चुरस झाली. त्यानंतर यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीने उडी घेतली. मुंबईने माघार घेतल्यानंतर चेन्नई आणि आरसीबी यांच्यात चुरस झाली. अष्टपैलू खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी कोणतीच फ्रँचायझी कसर सोडू इच्छित नव्हती. पण, पर्स खाली होत असल्याने आणि रक्कम जास्त झाल्याने चेन्नईने माघार घेतली. मग सनरायझर्स हैदराबादने बोली लावण्यास सुरूवात केली. बंगळुरू आणि हैदराबाद यांची फ्रँचायझी कमिन्सला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी रणनीती आखत होती. अखेर बंगळुरू आणि आरसीबी यांनी मोठी पर्स मोजण्याचा इरादा कायम ठेवला. लक्षणीय बाब म्हणजे सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीने मोठी रक्कम मोजत कमिन्सला २०.५० कोटीत आपल्या संघात घेतले.