भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोघांमध्ये कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील शेवटची कसोटी सुरु झाली असतानाच एक महत्त्वाची बातमी आली. IPL मध्ये एकेकाळी सर्वात महागडा विकला गेलेला दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस याने ३४व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. IPL च्या एका हंगामात ख्रिस मॉरिसवर सर्वात जास्त बोली लागली होती. मात्र त्याने कमी वयातच सर्व प्रकारच्या क्रिकेटला रामराम ठोकला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने हा निर्णय जाहीर केला.
ख्रिस मॉरिसने मंगळवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून निवृत्तीची घोषणा केली. ख्रिस मॉरिसने लिहिलं की आज मी सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्त होत आहे. माझ्या क्रिकेट कारकिर्दीत मला ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला त्या साऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. ख्रिस मॉरिस आता दक्षिण आफ्रिकेतील फ्रेंचायजी क्रिकेट खेळणाऱ्या टायटन्स संघाच्या प्रशिक्षकाच्या रूपात दिसणार आहेत.
ख्रिस मॉरिस IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. IPL 2021 च्या लिलावात ख्रिस मॉरिसवर तब्बल १६.२५ कोटींची बोली लावण्यात आली होती. राजस्थान रॉयल्स संघाने त्याला विकत घेतले होते. युवराज सिंगच्या ऐतिहासिक बोलीचा विक्रम मोडीत काढत तो सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
मॉरिसने IPL कारकिर्दीत अनेक संघांकडून सामने खेळले. चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स या संघांचे त्याने प्रतिनिधित्व केले. IPL 2021 मध्ये ख्रिस मॉरिस राजस्थानकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याने १५ गडी बाद केले होते. संपूर्ण IPL कारकिर्दीत मॉरिसने एकूण ८१ सामने खेळले. त्यात त्याने ९५ बळी टिपले.
मॉरिसने आफ्रिकेच्या संघाकडून खेळतानाही ४२ वनडेमध्ये ४८ बळी घेतले. कसोटी सामन्यात मात्र त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्याला केवळ ४ कसोटीच खेळायला मिळाल्या.