चेन्नई, आपीएल 2019 : पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले. या हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी अनेक जण सरसावले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही ( बीसीसीआय) पुढाकार घेऊन शहीद कुटुंबियांच्या मदतीसाठीच्या आर्मी वेल्फेअर फंडमध्ये 20 कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातील लोकांच्या भावना लक्षात घेता बीसीसीआयनं इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल 2019) उद्धाटन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
या उद्धाटन सोहळ्यासाठीचा 20 कोटींचा निधी भारतीय सैन्याला देण्यात येणार आहे. त्यानुसार 11 कोटी हे सैन्याला, 7 कोटी सीआरपीएफ आणि प्रत्येकी एक कोटी नौदल व वायूदल यांना देण्यात येणार आहेत. याबाबत प्रशासकिय समितीचे प्रमुख विनोद राय म्हणाले की,''एक संघटना म्हणून आयपीएल स्पर्धेचा उद्धाटन सोहळा रद्द करण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यापेक्षा उद्धाटन सोहळ्याला होणारा खर्च सामाजिक कार्यासाठी वापरण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.
प्रशासकीय समिती सदस्य डायना एडुल्जी म्हणाल्या की,''हा निर्णय स्वागतार्ह आहे आणि दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा आम्ही आदर करतो. बीसीसीआय नेहमी राष्ट्रहिताच्या बाजूने उभे राहिलेले आहेत आणि पुढेही आम्ही अशा सामाजिक कार्यासाठी हातभार लावत राहू.''
आयपीएलचा ‘महासंग्राम’ आजपासून
आयपीएलच्या बाराव्या हंगामाला आज, शनिवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज संघ विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाशी खेळणार आहे. चेन्नईच्या मैदानावर हा सामना रंगणार असल्यामुळे या सामन्याला चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतील, अशी आशा आहे. दरम्यान, या सामन्यासाठी विराट कोहली आणि धोनी यांनीही कसून सराव केला.कोहली अॅन्ड कंपनीने धोनीच्या धुरंधरांना त्यांच्या घरच्या मैदानावर धूळ चारली तर बेंगळुरुसाठी हा सर्वांत मोठा श्रीगणेशा ठरणार आहे.
चेन्नई संघात ३० वर्षांवरील खेळाडू आहेत. धोनी आणि शेन वॉटसन हे दोघे ३७, तर ड्वेन ब्राव्हो ३५, फाफ डुप्लेसिस ३४ तसेच अंबाती रायुडू आणि केदार जाधव ३३, सुरेश रैना ३२, फिरकीपटू इम्रान ताहिर ३९ आणि हरभजनसिंग ३८ वर्षांचा आहे. राष्ट्रीय संघाबाहेर असलेला कर्ण शर्मा ३१ आणि वेगवान गोलंदाज मोहित शर्मा ३० वर्षांचा आहे. या संघाने वयावर मात करीत आयपीएलचे सामने गाजविले हे विशेष. नेहमी अव्वल चार संघात राहून चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधीही दिली. चेन्नई संघ तीनवेळेचा विजेता असला तरी बेंगळुरू संघात अनेक दिग्गज आहेत पण एकदाही त्यांना जेतेपद पटकविता आले नाही. पहिल्या सामन्याचा निकाल गोलंदाजांच्या कामगिरीवर तसेच दडपण झेलण्याच्या खेळाडूंच्या क्षमतेवर विसंबून असेल.