इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) उद्घाटन सोहळ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) जवळपास 30 कोटी रुपये मोजावे लागतात. 2008 पासून सुरू झालेल्या या लीगचा उद्धाटन सोहळा हा दणक्यात साजरा केला जातो. या सोहळ्यात बॉलिवूडच्या सेलिब्रेटींचे परफॉर्मन्स होतात. पण, हा उद्धाटन सोहळा म्हणजे पैशांचा अपव्यय, असे मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळेच 2020च्या लीगच्या उद्घाटन सोहळ्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात पार पडलेल्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत हा मुद्दा चर्चिला गेला. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 2020च्या मोसमात ‘पॉवर प्लेयर’ ही नवी संकल्पना राबविण्यात येणार अशी चर्चा होती, परंतु बीसीसीआयच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. पॉवर प्लेअर ही संकल्पना स्थानिक क्रिकेटमध्ये राबवण्यात येईल, असे एकमत झाले. त्यामुळे आगामी मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत हा पर्याय वापरला जाईल.
यावेळी स्पर्धा कालावधीही वाढवण्यावर चर्चा झाली. त्यानुसार मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत आयपीएल स्पर्धा खेळवण्यात येणार असल्याचे कळते. शिवाय No ball वर लक्ष ठेवण्यासाठी एक अतिरिक्त अंपायर नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याचीही स्थानिक क्रिकेटमध्ये चाचपणी केली जाईल.
या बैठकीत उद्धाटन सोहळ्याचा मुद्दाही चर्चेत आला. क्रिकेट चाहत्यांना उद्धाटन सोहळा बघण्यात कोणताही रस नसतो. त्यासाठी पैसा खर्च करणे म्हणजे अपव्ययच.. त्यामुळे 2020च्या मोसमात उद्घाटन सोहळा होणार नाही,असा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. No Ball बद्दल अधिकाऱ्यानं सांगितलं की,''गेल्या मोसमात असे अनेक खेळाडू नो बॉलवर बाद झाल्याचे रिप्लेत दिसले. त्यामुळे अशा चुका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ''
2019च्या मोसमातही उद्धाटन सोहळा रद्द करण्यात आला होता. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.