मार्चमध्ये लांबणीवर टाकण्यात आलेल्या आयपीएलच्या आयोजनावर अद्याप चर्चा सुरू आहे. कोरोनामुळे क्रिकेटविश्वावर विपरीत परिणाम झाला. मात्र केवळ याच कारणामुळे आयपीएल आयोजनावर टांगती तलवार राहिली नाही, तर टी२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत अद्याप आयसीसीने कोणतीही भूमिका घेतली नसल्यानेही आयपीएलबाबत निर्णय घेण्यास विलंब होत आहे. शुक्रवारी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीमध्ये भारतीय क्रिकेटबाबत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. त्यात आयपीएल आयोजनाचा मुख्य विषय होता. त्याचप्रमाणे ‘कॅग’ प्रतिनिधी अलका रेहानी यांनी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या उपस्थितीबाबत ‘रेड सिग्नल’ दिल्याने शाह बैठकीत उपस्थित राहणार की नाही, याकडेही अनेकांचे लक्ष होते.
शाह यांनी सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला असून लोढा समितीच्या शिफारशीनुसार आता बीसीसीआयच्या कामकाजामध्ये ते सहभाग घेऊ शकत नाहीत. तसेच, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची परिस्थिती सध्या अशीच असून त्यांचाही सहा वर्षांचा कार्यकाळ महिन्याच्या अखेरीस संपणार आहे. त्यानंतर त्यांनाही ‘कॅग’ प्रतिनिधी कामकाजापासून दूर ठेवतील. एकीकडे शाह यांच्या उपस्थितीबाबत वादळ निर्माण झाले असताना, दुसरीकडे आयपीएलचा मुद्दा अधिक चिंतेचा ठरत आहे. इतक्या मोठ्या स्पर्धेच्या तयारीसाठी किमान दोन महिन्याचा कालावधी लागतो. याहून अधिक वेळ लागला तर निश्चित परिणाम होईल.
कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे आॅस्टेÑलियानेही आॅक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषक आयोजनावर शंका व्यक्त केली आहे. आयसीसीकडून लगेच निर्णय घेतला जात नसला, तरी सध्या सुरू असलेल्या परिस्थितीमुळे काही प्रमाणात त्यामागची कारणे समजू शकतात. जर टी२० विश्वचषक रद्द केली आणि काही कारणास्तव आयपीएलचे आयोजनही झाले नाही, तर क्रिकेटविश्वासाठी हा दुहेरी फटका असेल. आयपीएल आयोजन सप्टेंबरच्या अखेरीस ते नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत करण्यास यूएईचा पर्याय सर्वोत्तम दिसत आहे. बीसीसीआयकडे सध्या तीन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे संपूर्ण स्पर्धा भारतात आयोजित करणे. दुसरा पर्याय अर्धी स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करून उर्वरित सामने भारतात खेळविणे. तिसरा पर्याय संपूर्ण स्पर्धाच यूएईमध्ये खेळविणे. आयसीसी आपली भूमिका स्पष्ट करेल, तेव्हाच हे शक्य होणार आहे.
आयपीएल आयोजनाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी बीसीसीआयचा प्रयत्न आहे. २००८ सालापासून सुरुवात झालेल्या या लीगच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटने आर्थिकदृष्ट्या खूप मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे या लीगच्या आयोजनामध्ये अडथळा यावा, अशी बीसीसीआयची अजिबात इच्छा नाही. आयपीएल झाल्यास केवळ बीसीसीआयचा फायदा होईल असे नाही. आयपीएलच्या एका सत्रातून अंदाजे होणारा नफा ३८०० ते ४ हजार कोटी इतका असून यातील एक हिस्सा इतर देशांच्या क्रिकेट संघटनेला दिला जातो.