Join us  

IPL च्या कामगिरीवर वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न पाहू नका, विराट कोहलीचा मास्टर स्ट्रोक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ट्वेंटी-20 मालिकेतील पराभव विसरून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2019 4:03 PM

Open in App

हैदराबाद, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ट्वेंटी-20 मालिकेतील पराभव विसरून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. या मालिकेतून वर्ल्ड कप साठीचा भारतीय संघ निडवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्नशील असणार आहे. लोकेश राहुलचे पुनरागमन दणक्यात झाले असले तरी वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याचे स्थान अद्याप पक्के नाही. त्यातच ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ही वर्ल्ड कप संघात स्थान मिळवण्याची शेवटची संधी असल्याचे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीनं व्यक्त केलं आहे. त्यात त्यानं इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) कामगिरीवरून वर्ल्ड कप संघात बदल केले जाणार नाही, असे स्पष्ट मत कोहलीनं व्यक्त केलं.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेला शनिवारी हैदराबाद येथील सामन्याने सुरुवात होणार आहे. घरच्या मैदानावर भारतीय संघाची ऑसींविरुद्धची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. 2009 नंतर ऑस्ट्रेलियाला भारतात एकही वन डे मालिका जिंकता आलेली नाही आणि याहीवेळेला भारताचे पारडे जड मानले जात आहे. ही स्पर्धा वर्ल्ड कपसाठीच्या संघ निवडीसाठी महत्त्वाची आहे. 

कोहली म्हणाला,'' या मालिकेतून वर्ल्ड कप स्पर्धेचा संघ निवडण्यात येईल. वर्ल्ड कप संघ निवडताना वेगळ्या गणितांचा विचार केला जातो आणि वर्ल्ड कपसाठी आम्हाला मजबूत संघ हवा आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच आम्हाला वर्ल्ड कप संघ निश्चित करायचा आहे. त्यामुळे आयपीएलमधील कामगिरीनंतर या संघात बदल होईल, असे मला वाटत नाही. एक-दोन खेळाडूंना आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही, म्हणून त्यांना संघातून वगळले जाईल असं नाही.''

असे मत व्यक्त करून कोहलीनं दिनेश कार्तिकच्या वर्ल्ड कप खेळण्याच्या अपेक्षांना सुरूंग लावला आहे. वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळण्याबाबद कोहली म्हणाला,'' एखाद्या सामन्यात संघाला गरज असेल तर मी चौथ्या स्थानावर खेळण्यास तयार. तसे करताना मला आनंदच होईल. मी यापूर्वीही अनेकदा चौथ्या क्रमांकावर खेळलो आहे आणि त्यामुळे त्यासाठी काही सामन्यांत प्रयोग करण्याची आवश्यकता नाही. तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आल्यानंतरही माझा खेळ आहे तसाच राहणार आहे.'' 

'' लोकेश राहुलचं कमबॅक ही संघासाठी सकारात्मक बाब आहे. त्याला सातत्य राखण्याची आवश्यकता आहे. वर्ल्ड कप संघासाठी तो चांगला पर्याय ठरू शकतो, परंतु त्याला कामगिरी उंचवावी लागेल,'' असे कोहलीनं स्पष्ट केलं. 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआयसीसीआयसीसी विश्वकप २०१९