IPL Playoffs 2024 Qualifier 1 KKR vs SRH: कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील IPLचा क्वालिफायर-1 सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाईल. या सामन्यात सर्वाधिक चर्चा होते ती म्हणजे पावसाची. IPL 2024 मधील आतापर्यंत 3 सामने पावसामुळे रद्द झाले. अशा परिस्थितीत कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील क्वालिफायर-1 सामन्यात पाऊस पडला तर काय होईल, असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे. गेल्या आयपीएल हंगामात केवळ अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता, या हंगामात आयपीएलच्या चारही प्लेऑफ सामन्यांसाठी राखीव दिवस आहे. पण तरीही सामना न झाल्यास पुढे काय... जाणून घेऊया.
क्वालिफायर-1 पावसामुळे खेळताच आला नाही तर...?
Accuweather.com च्या मते, अहमदाबाद येथे २१ मे रोजी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील क्वालिफायर-1 सामन्यात पावसाची शक्यता कमी आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 21 मे रोजी अहमदाबादमधील हवामान आल्हाददायक आणि ऊन असेल. मात्र, दुसऱ्या डावात दव महत्त्वाची भूमिका बजावेल. सामन्यादरम्यान पाऊस पडल्यास षटकांमध्ये कपात होऊ शकते. मुसळधार पाऊस पडल्यास सामना प्रत्येकी किमान 5 षटकांचा करण्याचा प्रयत्न केला जाईल. हेही शक्य नसेल तर सामना राखीव दिवशी खेळवला जाईल. राखीव दिवशी, पावसामुळे सामना आदल्या दिवशी सोडला होता तिथून सुरू होईल.
राखीव दिवशीही सामना पूर्ण न झाल्यास...
राखीव दिवशी देखील पावसामुळे सामना खेळता आला नाही तर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ (KKR) अंतिम फेरीत पोहोचेल. कारण लीग टप्प्यात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघ 14 सामन्यांत 20 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याच वेळी, सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघ 14 सामन्यांत 17 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. नियमांनुसार, पॉइंट टेबलमध्ये चांगल्या स्थितीत असल्यामुळे, सामना रद्द झाल्यास कोलकाता नाइट रायडर्सला (KKR) अंतिम फेरीचे तिकीट मिळेल.