IPL Points Table 2023: मुंबई इंडियन्सने शानदार विजय मिळवताना गतविजेत्या गुजरात टायटन्सचा २७ धावांनी धुव्वा उडवला. सूर्यकुमार यादवने झळकावलेले स्फोटक नाबाद शतक मुंबईच्या विजयात निर्णायक ठरले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत बाद २१८ धावा केल्यानंतर गुजरातला २० षटकांत ८ बाद १९१ धावांवर रोखले.
लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची आठव्या षटकात ५ बाद ५५ धावा अशी अवस्था करून मुंबईने निकाल स्पष्ट केला. डेव्हिड मिलर आणि राशिद खान यांनी गुजरातकडून अपयशी झुंज दिली. आकाश मढवाल, पीयूष चावला व कुमार कार्तिकेय यांनी गुजरातच्या फलंदाजीला खिंडार पाडले. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या राशीदने आक्रमक अर्धशतक फटकावले. त्याने अल्झारी जोसेफसोबत नवव्या गड्यासाठी ४० चेंडूंत नाबाद ८८ धावांची भागीदारी केली. यामध्ये एकट्या राशीदने २८ चेंडूंत ७७ धावा कुटल्या. त्याआधी सूर्यकुमार यादवने स्फोटक नाबाद शतक झळकावले. कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी पॉवर प्लेमध्येच ६१ धावा झळकावल्या. यानंतर राशीदने ४ बळी घेतले.
मुंबई इंडियन्सच्या या विजयानंतर आयपीएलमधील गुणतालिका आणखी रंगत झाली आहे. मुंबईने या विजयासह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मुंबईचे १४ गुण झाले आहेत. मुंबईविरुद्ध पराभव झाल्यानंतरही गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे. गुजरातचे १६ गुण आहेत. तर धोनीचा चेन्नई संघ १५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानचा संघ १२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. लखनौ पाचव्या स्थानावर असून त्यांचे ११ गुण आहेत. आरसीबी १० गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. तर केकेआर १० गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. पंजाब आठव्या क्रमांकावर असून पंजाबचे १० गुण आहे. नवव्या क्रमांकावरील हैदराबाद संघाचे ८ गुण असून दिल्ली ८ गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे.
आज हैदराबाद विरुद्ध लखनौ
आज हैदराबादच्या घरच्या मैदानावर म्हणजेच राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर हे दोन्ही संघ आमने-सामने येतील. दुपारी ३.३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. लखनौ सुपर जायंट्स संघाला त्यांच्या मागील सामन्यात गुजरात टायटन्स संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसरीकडे सनरायजर्स हैदराबाद संघाने मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला.
पंजाबविरुद्ध दिल्ली
पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स दोन्ही संघांनी त्यांच्या मागील सामन्यात विजय मिळवला आहे. असं असलं तरी दिल्ली कॅपिटल्स संघाचं यंदाच्या मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंगलं आहे. पण, पंजाबसाठी आजच्या सामन्याच्या निर्णयावर आशा कायम आहे. आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर हे दोन्ही संघ आमने-सामने येतील. संध्याकाळी ७.३० वाजता सामन्याला सुरुवात होईल.