चेन्नई : मुंबई इंडियन्स आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी, फलंदाजी विभागात सुधारणा करण्याच्या उद्देशाने ‘आयपीएल’मध्ये आज, शुक्रवारी पंजाब किंग्सच्या आव्हानाला सामोरे जाणार आहे. पंजाब किंग्स संघ विजयी मार्गावर परतण्यासाठी संघर्ष करीत आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघ फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभूत झाला. तो पराभव विसरून मुंबई संघ पुनरागमन करण्यास प्रयत्नशील आहे. कर्णधाराने स्वत: चांगली फलंदाजी केली; पण अन्य फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले. मधली फळी अपयशी ठरणे हा संघासाठी चिंतेचा विषय आहे.
मुंबईचे गोलंदाज चांगली कामगिरी करीत संघाला विजय मिळवून देतात; पण दिल्लीविरुद्ध मात्र त्यांना त्यात अपयश आले. त्यांना फलंदाजांकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांचे काम सोपे होईल.
रोहित दिल्लीविरुद्धच्या लढतीत फॉर्मात दिसला; पण २०२० च्या यशस्वी मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणारे सूर्यकुमार यादव व ईशान किशन मॅचविनरची भूमिका बजावण्यात अपयशी ठरत आहेत. त्याची मुंबई संघाला झळ बसली आहे. या व्यतिरिक्त किरोन पोलार्ड व पांड्या बंधू हार्दिक व कुणाल यांनाही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.