आयपीएल २०२५ पूर्वी खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची (रिटेन्शन) मुदत गुरुवारी संपली. त्यानुसार सर्व दहा संघांनी आपापल्या संघासाठी काही दिग्गजांना मोठमोठ्या रकमा देत कायम ठेवले आहे. त्यात सर्वाधिक महागडा ठरला तो दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हेनरिक क्लासेन. हैदराबादने क्लासेनला २३ कोटी मोजले. पाठोपाठ बंगळुरू संघाने 'किंग' विराट कोहली याला, तर लखनौ संघाने वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरन याला २१ कोटी रुपये देत कायम ठेवले. मुंबई संघाने कर्णधार हार्दिक पांड्या आणि धडाकेबाज सूर्यकुमार यादव यांना प्रत्येकी १६,३५ कोटी, तर अनुभवी रोहित शर्मा याला १६.३० कोटी रुपये दिले.
राहुलने स्वत:च्या पायावर मारली कुऱ्हाड?
लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचे मालक संजीव गोयंका यांनी कर्णधार लोकेश राहुल याला १८ कोटींची ऑफर दिली होती; पण त्याने ती नाकारली आणि मेगा लिलावाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या नकारामुळे गोयंका यांनी स्फोटक फलंदाज निकोलस पूरन याला २१ कोटी देत संघात कायम राखले. राहुलला आता लिलावात १८ कोटी मिळतील की नाही, याची खात्री देता येत नाही. राहुलने गेल्या सत्रात लखनौसाठी ५२० धावा केल्या, परंतु संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नव्हता.
चेन्नईने कायम ठेवलेल्या पाच खेळाडूंमध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा समावेश आहे. चाहत्यांना सर्वांत मोठा दिलासा धोनीच्या रूपाने मिळाला आहे. गेल्या सत्रापासून तो पुढच्या सत्रात खेळणार नसल्याच्या अफवा पसरल्या होत्या; पण माहीने खेळण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने धोनीला 'अनकॅप्ड खेळाडू म्हणून चार कोटी रुपये दिले. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार धोनी हा आयपीएलचा पहिला 'व्हॅल्यू फॉर मनी' खेळाडू बनला.
पंजाब संघाने रिटेन्शनमध्ये सर्वांत कमी पैसा खर्च केला, त्यांनी शशांक सिंग ५.५ कोटी, तर प्रभसिमलसिंग याला चार कोटींत संघात घेतले. विशेष असे की, हे दोघेही अनकॅप्ड खेळाडू आहेत. संघाकडे ११०.५० कोटी शिल्लक आहेत. संघाकडे चार राइट टू मॅच कार्ड उपलब्ध असतील, राजस्थान संघ सर्वांत कमी अर्थात ४२ कोटी रुपयांसह लिलावात उतरणार आहे.