Mumbai Indians Retained Players List : क्रिकेट विश्वाला ज्या क्षणाची उत्सुकता होती तो क्षण अखेर आज आला. आयपीएलच्या सर्व दहा फ्रँचायझींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. मुंबई इंडियन्सनेरोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या पाच जणांना अपेक्षेप्रमाणे रिटेन केले. मात्र, ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबईच्या संघाची धुरा सांभाळणार का? हा प्रश्न चाहत्यांना सतावत होता. किंबहुना मुंबईची फ्रँचायझी कर्णधारपदाची माळ पुन्हा एकदा हिटमॅनच्या गळ्यात घालणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे.
गतवर्षी प्रथमच हार्दिक पांड्याने मुंबईचे कर्णधारपद सांभाळले. मात्र, फ्रँचायझीचा हा निर्णय चाहत्यांना चांगलाच खटकला. त्यामुळे हार्दिकला चाहत्यांनी ट्रोल करत आपला रोष व्यक्त केला. परंतु, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हार्दिकने कमाल केली, त्यात त्याच्या पत्नीने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून हार्दिकचे टीकाकार त्याचे हितचिंतक बनले आहेत. त्याच्याभोवती सहानुभूतीची लाट पसरली. खरे तर मुंबईच्या संघाने आपल्या निर्णयावर कायम राहत हार्दिकला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या आगामी हंगामातदेखील मुंबईच्या संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याच सांभाळताना दिसेल. रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करताना मुंबईने कर्णधारपदाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये जसप्रीत बुमराहला मोठी रक्कम मिळाली आहे. १८ कोटी रुपयांसह MI ने स्टार गोलंदाजाला आपल्या ताफ्यात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या पाठोपाट हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवसाठी १६.३५ कोटी रुपये तर रोहित शर्मासाठी मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने १६.३० कोटी रुपये मोजले आहेत. याशिवाय तिलक वर्माला ८ कोटी रुपयांत रिटेन करण्यात आले आहे.