नवी दिल्ली : ज्या खेळाडूंची आयपीएल लिलावासाठी निवड केली जाते, त्यांच्यावर संघ बोली लावतात. बोली खेळाडूंच्या मूळ किमतीनंतर सुरू होते. जो संघ सर्वाधिक बोली लावेल, त्यांच्याकडे तो खेळाडू जातो.खेळाडूंना जी रक्कम मिळते ती त्याचे एका पर्वाचे वेतन मानले जाते. त्यानुसार कर लावला जातो.ही रक्कम केवळ खेळाडूंची असते. त्यात कुणाचाही वाटा नसतो.वेतन हे एका पर्वासाठी असते. एखाद्या खेळाडूला दहा कोटी मिळत असतील आणि करार तीन वर्षांचा असेल तर त्याला ३० कोटी दिले जातील मात्र त्याची उपस्थिती अनिवार्य असावी.
विदेशी खेळाडू जितकी रक्कम कमवित असेल त्याच्या २० टक्के रक्कम बीसीसीआय त्याच्या बोर्डाला देते. उदा. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू दहा कोटी रुपयांत करारबद्ध झाल्यास त्याच्या बोर्डाला दोन कोटी दिले जातात. ही रक्कम आयपीहलच्या ‘सेंट्रल रेव्हेन्यू पूल’मधून दिली जाते. २००८ ला आयपीहलची सुरुवात झाली त्यावेळी रक्कम यूएस डॉलरमध्ये मोजली जायची. २०१२पासून ही रक्कम भारतीय रुपयांत मोजली जाऊ लागली.
एखाद्या खेळाडूचा करार वर्षभराचा असेल तर त्याला पुढच्यावर्षी तेवढ्याच रकमेचा करार दिला जातो. कराराची रक्कम किती टप्प्यात द्यायची हे संघ ठरवतात. एखाद्या संघाला एकरकमी वेतन द्यायचे असेल तर ते देऊ शकतात. काही संघ पहिले शिबिर सुरू होण्याआधी अर्धे वेतन देतात. स्पर्धा सुरू असताना नंतरची अर्धी रक्कम दिली जाते. काही संघ स्पर्धा सुरू होण्याआधी १५ टक्के, स्पर्धेदरम्यान ६५ टक्के आणि स्पर्धा संपल्यानंतर लगेच २० टक्के रक्कम देतात.