IPL 2025 च्या हंगामात काही संघ नवीन कर्णधारांसह मैदानात उतरणार आहेत. त्यापैकी एका फ्रँचायझीने आपल्या कर्णधाराचे नाव जाहीर केले आहे. पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या पंजाब किंग्जने स्टार भारतीय फलंदाज आणि आयपीएल विजेता कर्णधार श्रेयस अय्यरला आपला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. अय्यरच्या नावाची घोषणा अतिशय खास पद्धतीने करण्यात आली. लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस'चा होस्ट आणि बॉलीवूड अभिनेता सलमान खानने एका खास भागात पंजाब किंग्जचा नवा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली. याचसोबत युजवेंद्र चहल याच्यावरही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली.
रविवारी प्रसारित झालेल्या बिग बॉस 'वीकेंड का वार'च्या विशेष भागामध्ये सलमान खानने श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली. श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल आणि शशांक सिंग या शोसाठी खास पाहुणे म्हणून उपस्थित होते. हे तिन्ही खेळाडू पंजाब किंग्जचा भाग आहेत. अय्यरला फ्रँचायझीचा नवा कर्णधार बनवले जाईल असा अंदाज बांधला जात होताच. त्यातच आता सलमान खानने शोमध्ये त्याची औपचारिक घोषणाही केली.
श्रेयस अय्यर पंजाब किंग्जचा सर्वात महागडा खेळाडू
श्रेयस अय्यर गेल्या मोसमापर्यंत कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता आणि त्याच्या नेतृत्वाखालीच कोलकाताने आयपीएल २०२४ चे विजेतेपद पटकावले. असे असूनही KKR ने त्याला रिटेन केलं नाही. नोव्हेंबरमध्ये झालेल्या मेगालिलावात पंजाब किंग्जने अय्यरला २६.७५ कोटींना खरेदी केले. अय्यर पंजाबचा सर्वात महागडा खेळाडू आणि आयपीएल इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू बनला.
युजवेंद्र चहलला देखील मिळाली खास जबाबदारी
पंजाबचे कर्णधारपद केवळ अय्यरकडेच नाही, तर स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहललाही एका खास कर्णधारपद मिळाले आहे. अय्यरच्या अनुपस्थितीत चहलला कर्णधार असेल असा विचार करत असाल तर तुम्ही चुकताय. चहलला वेगळ्याच कारणासाठी कर्णधार बनवण्यात आले आहे. श्रेयस अय्यरने स्वत: सांगितलं की, तो जरी संघाचा कर्णधार असला तरी सामन्यानंतरची पार्टी किंवा मजा-मस्ती करण्यासाठी मैदानाबाहेरचा कर्णधार युजी चहल असणार आहे.
Web Title: IPL: Shreyas Iyer is the new captain of Punjab team! Yuzvendra Chahal has also been given a big responsibility
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.