- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटर, लोकमतदेशाबाहेर आयपीएलचे आयोजन करण्यासाठी अखेर केंद्र सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आणि स्पर्धा आयोजनातील मार्ग अधिक सुकर झाला. मार्च महिन्यात आयपीएल अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकल्यापासून बीसीसीआयला या स्पर्धेच्या आयोजनासाठी चिंता होती. कोरोनामुळे देशात सातत्याने लॉकडाऊन काळ वाढत असल्याने, यंदाच्या आयपीएलच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर आॅक्टोबरमध्ये आॅस्टेÑलियात होणारी टी-२० विश्वचषक स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आणि आयपीएल आयोजनाचा मार्ग मोकळा झाला. मात्र, आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यातील तणावपूर्ण संबंध पाहता, हा निर्णय सहजसोपा नव्हता.आता आयपीएलचे आयोजन निश्चित झाले असल्याने बीसीसीआयला नक्कीच दिलासा मिळाला आहे. मात्र यामध्येही अडचणी आहेत. यंदाची स्पर्धा यूएईमध्ये होत असून, इतक्या कमी वेळेमध्ये विदेशामध्ये इतक्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करणे आव्हानात्मक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, आर्थिक बाजूचा विचार करता बीसीसीआयकडे आणखी एक मोठे आव्हान आहे. गेल्याच आठवड्यात आयपीएलचे मुख्य प्रायोजक म्हणून चिनी मोबाईल कंपनी विवोने माघार घेतली.दुसरीकडे, बीसीसीआयने अधिकृतपणे जाहीर केले की, केवळ या वर्षासाठी विवो आयपीएलचे मुख्य प्रायोजक नसेल. त्यामुळे विवोचे पुन्हा एकदा आयपीएलचे मुख्य प्रायोजक म्हणून पुनरागमन होऊ शकते. त्याच वेळी, क्रिकेट प्रशासक आणि व्यावसायिक जगामध्ये अशी चर्चा आहे की, हा निर्णय बीसीसीआय आणि विवो यांनी चर्चा करून घेतला आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांनी सध्या भविष्यातील स्थितीवर नजर ठेवली आहे आणि त्यानुसार त्यांच्याकडून निर्णय घेण्यात येऊ शकतील. जर भारत-चीन यांच्यातील तणाव कमी झाला, तर विवो कदाचित पुढच्याच आयपीएलसाठी आपल्याला मुख्य प्रायोजक म्हणून दिसू शकतो.सध्याच्या परिस्थितीमध्ये ४४० कोटी रुपयांचा फायदा मिळवून देणारा प्रायोजक शोधणे आव्हानात्मक काम आहे. शिवाय आयपीएलची रोमांचकता आणि त्याचे आकर्षण लक्षात घेता, प्रायोजकांना सवलत मिळणेही अवघड आहे. आर्थिक मुद्यावरूनच काही दिवसांपूर्वी बीसीसीआय आणि फ्रेंचाईजींमधीलसंबंध ताणले गेले होते. यूएईमध्ये प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत किंवा मर्यादित प्रेक्षकांच्या उपस्थितीत स्पर्धा झाल्यास त्याचा मोठा परिणाम तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावर होईल. साहजिकच याचा परिणाम संघांच्या प्रायोजक आणि साहित्य विक्रीवरही होईल.साधारणपणे, आयपीएल संघांच्या प्रायोजकासाठी अनेक कंपन्या रांगा लावतात.मात्र यंदा कोरोनाची परिस्थिती, त्यात उशिराने झालेली स्पर्धा आयोजनाची घोषणा यामुळे चित्र वेगळे आहे. एकूणच बीसीसीआयसह फ्रेंचाईजींनाही आर्थिक फायद्याची चिंता आहे. त्याच वेळी एक गोष्ट दोन्ही बाजूंसाठी दिलासादायक आहे. ब्रॉडकास्ट फीमध्ये कोणतीही घसरण झालेली नसल्याने बीसीसीआय आणि फ्रेंचाईजींना त्याद्वारे बºयापैकी नफा मिळेल. एकूणच यंदा दोघांचे उत्पन्न नक्कीच कमी होईल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आयपीएल, प्रायोजक आणि फायदा
आयपीएल, प्रायोजक आणि फायदा
यंदा कोरोनाची परिस्थिती, त्यात उशिराने झालेली स्पर्धा आयोजनाची घोषणा यामुळे चित्र वेगळे आहे. एकूणच बीसीसीआयसह फ्रेंचाईजींनाही आर्थिक फायद्याची चिंता आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 11:54 PM