IPL Delhi Capitals: आशिया चषक स्पर्धेत काल पाकिस्तानच्या संघाने अफगाणिस्तानला पराभूत केले. पाकिस्तानी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे अफगाणिस्तानने २० षटकात १२९ धावा केल्या. १३० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना १० षटकांपर्यंत पाकिस्तानचा डाव संथ होता. नंतर पाकिस्तानच्या शादाब खान-इफ्तिखारने फटकेबाजी करत सामना फिरवला. शेवटच्या टप्प्यात पुन्हा अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत सामन्यात रंगत आणली होती. पण शेवटच्या षटकात ११ धावांची आवश्यकता असताना, नसीम शाहने पहिल्या दोन चेंडूत दोन षटकार खेचत पाकिस्तानला १ गडी राखून विजय मिळवून दिला. एकीकडे आशिया चषकाची धूम सुरू असतानाच, IPL मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेल्या एका स्टार खेळाडूवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तसेच, त्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा स्पिनर आणि नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याच्यावर येथील एका हॉटेलच्या खोलीत १७ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. या अल्पवयीन मुलीने मंगळवारी गौशाला महानगर पोलीस सर्कलमध्ये दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालात (FIR) आरोप केला आहे की, २२ वर्षीय लामिछाने याने तीन आठवड्यांपूर्वी एका हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला. गौशाला पोलिस वर्तुळात नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, लामिछाने याने २१ ऑगस्ट रोजी मुलीला काठमांडू आणि भक्तपूर येथे विविध ठिकाणी नेले. त्याच रात्री काठमांडूतील एका हॉटेलमध्ये त्याने तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी मात्र या घटनेबाबत CCTV फुटेजसह इतर पुरावे गोळा करत असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा योग्य तपास केल्याशिवाय काहीही सांगता येणार नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.
लामिछाने सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) खेळत आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळणारा तो नेपाळचा पहिला खेळाडू आहे. त्याने २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीसाठी पदार्पण केले. नुकतीच नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी लामिछाने याची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टमध्ये, क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळ (CAN) ने सांगितले की, लामिछानेने आरोप नाकारले असून आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. पण ताज्या माहितीनुसार, काठमांडू कोर्टाकडून लामिछाने विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.