विराट कोहलीला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये १७ वर्षांत एकही जेतेपद पटकावता आलेले नाही आणि यावरून इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने भारतीय फलंदाजाची खिल्ली उडवली. भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव केला. २७ जून रोजी प्रोव्हिडन्स स्टेडियमवर भारताच्या विजयानंतर, ICC ने विराटसाठी एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टवरील कॅप्शनमध्ये आयसीसीने लिहिले आहे की, “राजाच्या मुकुटातून शेवटचा दागिना गायब आहे. विराट कोहली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेतेपदापासून एक पाऊल दूर आहे.''
या पोस्टवर स्टुअर्ट ब्रॉडने “IPL?” असे लिहून विराटची खिल्ली उडवली. इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आयपीएलमधील जेतेपदाच्या दुष्काळावरून ही कमेंट केली. त्यावरून चाहत्यांनी ब्रॉडला घेरले आणि अनेकांनी युवराज सिंगच्या सहा षटकारांची आठवण करून दिली. ब्रॉडने नंतर ही कमेंट डिलीट केली, परंतु तरीही नेटिझन्सनी स्क्रीनशॉट शेअर करून त्याला ट्रोल करणे सुरूच ठेवले.
सध्या सुरू असलेली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विराटला फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. आयपीएल २०२४ मध्ये विराटने सर्वाधिक ७४१ धावा करून ऑरेंज कॅप जिंकली होती. पण, आयसीसी स्पर्धेत खेळलेल्या सात सामन्यांमध्ये त्याला फक्त ७५ धावाच करता आल्या आहेत. कोहलीने अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध अनुक्रमे २४ आणि २७ धावा करून केवळ दोन वेळा दुहेरी अंक गाठला आहे. विराटला अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध भोपळ्यावर माघारी जावे लागले होते.