IPL Sunil Narine: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या सुनील नरेनवर (Sunil Narine) या हंगामातही सर्वांचे लक्ष असणार आहे. IPL 2023 सुरू होण्यापूर्वी सुनील नरेनने एका सामन्यात आश्चर्यकारक गोलंदाजी केली आहे. सुनील नरेनने सामन्यात 7 षटके टाकली, ज्यामध्ये सर्वच्या सर्व मेडन्स होते आणि या दरम्यान त्याने 7 विकेट्सदेखील घेतल्या.
सुनील नरेनने वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या स्थानिक स्पर्धेत हा पराक्रम केला आहे. क्वीन्स पार्क क्रिकेट क्लबकडून खेळताना सुनील नरेनने क्लार्क रोड युनायटेडविरुद्ध हा मोठा विक्रम केला. त्याच्या या अप्रतिम पराक्रमामुळे प्रतिस्पर्धी संघ पहिल्या डावात अवघ्या 76 धावांत सर्वबाद झाला.
सुनील नरेनने 7 षटकांत 7 बळी घेत एकही धाव दिली नाही. त्याच्याशिवाय शॉन हॅकलेटने 18 धावांत 2 बळी घेतले. क्लार्क रोडकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा स्कोर 21 होता. या सामन्यात क्वीन्स पार्क संघाने 3 गडी गमावून 268 धावा केल्या आणि 192 धावांची आघाडी घेतली.
मॅचचा स्कोरबोर्ड-• क्लार्क रोड यूनायटेड- 76/10, सुनील नरेन- 7/0• क्वींस पार्क क्रिकेट क्लब- 268/3, इसाह राजा- 100
34 वर्षीय सुनील नरेनला IPL चा मिस्ट्री बॉलर म्हटले जाते. त्याने आतापर्यंत आयपीएल करिअरमध्ये एकूण 148 सामने खेळले असून, यात त्याच्या नावे 152 विकेट्स आहेत. सुनील नरेनने 7 वेळा आयपीएलमध्ये 4 विकेट आणि एकवेळा पाच विकेट घेतल्या आहेत.
इंटरनेशनल करिअरबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने वेस्टइंडीज़साठी 6 टेस्टमध्ये 21 आणि 65 वनडेमध्ये 92 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय, 51 टी-20 मध्ये 52 विकेट त्याच्या नावे आहेत. आयपीएलमध्ये 2023 मध्ये तो कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना दिसणार आहे.