मुंबई : मुंबई इंडियन्स विरोधातील 'करो या मरो' च्या सामन्यात काल चेन्नईचा पराभव झाला. यासाठी DRS ला सर्वाधिक जबाबदार धरले जात आहे. कारण सामना सुरू झाल्यानंतर, सुरुवातीला काही वेळ डीआरएस सुविधा उपलब्ध नव्हती. लाईट नसल्याने संपूर्ण सिस्टिम ऑफ झाली होती. दरम्यान, याच वेळेत डेवॉन कॉन्वे वादग्रस्त पद्धतीने LBW झाला. पण, चेन्नईला DRS चा वापर करता आला नाही. यावरून आता भारताचा दिग्गज माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने संपूर्ण सिस्टिमलाच फटकारले आहे.
सेहवागने DRS साठी जनरेटरचा वापर न करण्यावरून प्रश्न उपस्थित केले आहे. तो म्हणाला, 'वीज नसल्याने डीआरएस सुविधा उपलब्ध नव्हती, ही आश्चर्याची गोष्ट आहे. ही एवढी मोठी लीग आहे, की एखाद्या जनरेटरचा वापर केला जाऊ शकतो. जे कुठले सॉफ्टवेअर होते, ते बॅकअपच्या माध्यमाने चालविले जाऊ शकत होते. हा बीसीसीआयसाठी एक मोठा प्रश्न आहे.'
'क्रिकबझ'शी बोलताना सेहवाग म्हणाला, 'वीज गेली तर काय होईल? जनरेटर केवळ मैदानातील प्रकाशासाठीच आहेत का? ब्रॉडकास्टर्स आणि त्यांच्या सिस्टिमसाठी नाही? जर सामना होत होता, तर डीआरएसचा वापर व्हायरलाच हवा होता अथवा डीआरएसचा वापर संपूर्ण सामन्यातच करायला नको होता. जर मुंबईच्या संघाने आधी फलंदाजी केली असती तर त्यांचे नुकसान झाले असते.'