इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढच्या हंगामाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. या हंगामासाठी येत्या 19 डिसेंबरला खेळाडूंचा लिलाव होणार आहे. पण, तत्पूर्वी भारताचा महान फलंदाज राहुल द्रविडनं आयपीएल मालकांवर नाराजी व्यक्त केली आहे. आयपीएल संघमालक संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकांमध्ये भारतीय प्रशिक्षकांना स्थान देत नसल्यावरून द्रविडनं नाराजी व्यक्त केली. परदेशातील प्रशिक्षकांप्रमाणेच भारतीय प्रशिक्षक कर्तबगार आहेत आणि तरीही त्यांची नियुक्ती केली जात नाही.
द्रविडनं सांगितले की,''भारताकडे अनेक चांगले प्रशिक्षक आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेवर माझा विश्वास आहे. क्रिकेटच्या अनेक आघाड्यांवर भारताकडे प्रतिभावान खेळाडू आहेत. तसेच प्रशिक्षक विभागातही आपल्याकडे कौशल्य असलेले प्रशिक्षक आहेत. त्यांचा आत्मविश्वास उंचावण्याची आवश्यकता आहे आणि त्यांच्या कौशल्याला वाव द्यायला हवा. मला खात्री आहे, याचा ते नक्की विचार करतील.''
''आयपीएलमध्ये आपल्या अनेक मुलांना सहाय्यक प्रशिक्षक म्हणून संधी मिळत नसल्यानं मी निराश आहे. भारतीय प्रशिक्षकांना संधी दिल्यास आयपीएलमधील संघांना फायदाच होईल. त्यांच्यापेक्षा चांगलं भारतीय खेळाडूंना कोणी ओळखू शकत नाही. त्यांना संधी द्यायला हवी,''असं द्रविड म्हणाला.
द्रविड हा राष्ट्रीय क्रिकेट असोसिएशनच्या प्रमुखपदी आहे. यापूर्वी त्याच्या मार्गदर्शनाखाली भारत A आणि 19 वर्षांखालील संघानं दमदार कामगिरी केली. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या 19 वर्षांखालील संघांन वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. शॉच्या नेतृत्वाखाली भारताने 2018चा 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला. या विश्वविजेत्या संघाला द्रविडने मार्गदर्शन केले होते. या स्पर्धेतून भारताला शॉ, गिल, शिवम मावी, मनोज कार्ला, कमलेश नागरकोटी आदी उदयोन्मुख खेळाडू दिले.