कोलकाता - भारतीय क्रिकेटमधील नावाजलेल्या प्रशिक्षकांपैकी एक असलेल्या चंद्रकांत पंडित यांना पुढील इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामासाठी कोलकाता नाईटरायडर्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. केकेआरकडून बुधवारी याची घोषणा करण्यात आली आहे. चंद्रकांत पंडित हे इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक बनलेल्या ब्रँडन मॅक्युलम यांची जागा घेईल. चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हल्लीच मध्य प्रदेशने आपले पहिले रणजी विजेतेपद पटकावले होते. तत्पूर्वी पंडित यांनी मुंबई आणि विदर्भच्या संघांना रणजीचं विजेतेपद जिंकून दिलं होतं.
देशांतर्गत संघांसोबत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या चंद्रकांत पंडित यांच्याकडे उच्चस्तरावरील ही पहिली मोठी जबाबदारी आहे. केकेआरचे सीईओ व्येंकी मैसूर यांनी सांगितले की, पुढच्या हंगामात चंद्रकांत पंडित हे आमचं नेतृत्व करणार असल्याचे आम्ही उत्साहित आहोत. ते जे काही करतात त्याबाबत व्यापक कटिबद्धता आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये यशाचं त्यांचं रेकॉर्ड हे सर्वांसमोर आहे. आम्ही कर्णधार श्रेयस अय्यरसोबत त्यांच्या चांगल्या भागीदारीची अपेक्षा व्यक्त करतो.
दरम्यान, केकेआरचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर चंद्रकांत पंडित यांनी सांगितले की, मी कोलकाता नाईटरायडर्सशी संबंधित खेळाडू आणि इतर व्यक्तींकडून येथील कौटुंबिक संस्कृती आणि यशस्वीतेच्या परंपरेबाबत ऐकले आहे. मी सहराकी कर्मचारी आणि संघाचा भाग राहिलेल्या खेळाडूंच्या स्तराबाबत मी उत्साहित आहे. मी पूर्ण विनम्रतेने आणि सकारात्मकतेने काम करण्याबाबत उत्साहित आहे. चंद्रकांत पंडित यांनी भारताकडून ५ कसोटी आणि ३६ एकदिवसीय सामने खेळले होते.